‘स्फोटक’ परिस्थितीतही ‘सलोखा’ ठेवणारी शांतता समिती! वादग्रस्त वक्तव्यानंतरही शहरात शांतता; हिंदू-मुस्लीम समुदायाकडून संयुक्त निषेध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इतिहासात किरकोळ कारणांवरुनही जातीय तणाव निर्माण होवून त्याला हिंसक वळण लागण्याच्या अनेक घटना असताना शुक्रवारी ‘स्फोटक’ प्रकार समोर येवूनही संगमनेर शहर मात्र शांत राहिले. यामागे पोलिसांची नेमकी भूमिका आणि हिंदू-मुस्लीम समुदायाकडून झालेला संयुक्त निषेध वरकरणी कारणीभूत दिसत असला तरीही त्याच्या मुळाशी मात्र पोलिसांनी बोलावलेली शांतता समितीची बैठकच असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकीकडे शेकडो किलोमीटर अंतरावरील त्रिपुरातील घटनेवरुन राज्यातील काही शहरांमध्ये हिंसाचार उसळलेला असताना संगमनेरात स्थानिक पातळीवर सोशल माध्यमात वादग्रस्त मजकूर प्रसारित होवूनही आणि त्यासाठी जवळपास निम्मे शहर दिवसभर बंद राहूनही कोणतीही अप्रिय घटना समोर आली नाही. यावरुन कधी नव्हे ते शांतता समितीचे महत्त्व अधोरेखीत झाले असून त्याद्वारे हिंदू-मुस्लीम ऐक्याचेही दर्शन घडले आहे.

गेल्या शुक्रवारी (ता.12) सोशल माध्यमातील फेसबुक या सोशल नेटवर्कींग साईटवर बनावट नावांचा वापर करुन काही विकृतांनी मुस्लीम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असा मजकूर प्रसारित केला होता. संगमनेरातील सलोख्याचे वातावरण बिघडावे या हेतूने प्रसारित करण्यात आलेल्या या मजकुराला संबंधितांनी संगमनेरातील एका हिंदुत्त्ववादी संघटनेलाही ‘टॅग’ करुन या मजकुराशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. फेसबुकवरील हा मजकूर समोर आल्यानंतर संगमनेरात मोठा तणाव निर्माण झाला. शहरातील मुस्लीमबहुल भागात संतप्त नागरिकांचे जमाव गोळा झाले. यादरम्यान जमावाकडून घोषणाबाजीही करण्यात आली आणि हजारोंच्या संख्येतील जमावाने थेट पोलीस ठाणे गाठून आपला निषेधही व्यक्त केला.

शुक्रवारी रात्री साडेनऊ नंतर घडलेल्या या घडामोडींनी संगमनेरातील वातावरण अतिशय ‘स्फोटक’ अवस्थेत पोहोचवले होते. मात्र मुस्लिम समाजातील आजी-माजी नगरसेवकांसह काही वयस्कर व अनुभवी मान्यवरांनी संतप्त जमावाला शांत ठेवण्यासह या संतापजनक घटनेशी संगमनेरातील कोणत्याही व्यक्ति अथवा संघटनेचा संबंध नसल्याचे जमावाला पटवून दिले. ही घटना केवळ मुस्लिम समाजासाठीच नव्हेतर शहरात वर्षोनुवर्षे गुण्यागोविंदाने राहणार्‍या सर्वच धर्मियांसाठी निषेधार्ह असल्याचे सांगण्यात आले. सदरचा मजकूर प्रसारित करतांना संगमनेरातील ज्या हिंदुत्त्ववादी संघटनेला टॅग करण्यात आले होते, त्यांनीही समोर येवून या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत या आक्षेपार्ह गोष्टीचा निषेध केल्याने निर्माण झालेला तणाव निवळला. या दरम्यान पोलिसांनीही जलद कारवाई करीत या प्रकरणातील तिघांचा शोध घेवून त्यांना अटक केली.

मात्र मुस्लीम समुदायातील एक गट या घटनेच्या निषेधार्थ ‘संगमनेर बंद’ करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने काहीसा पेच निर्माण झाला होता. त्यातून शांततेचा भंग होवू नये यासाठी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी शनिवारी (ता.13) शांतता समितीची बैठक बोलावली. या बैठकीत हिंदू व मुस्लीम समुदायातील आजी-माजी नगरसेवकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही धर्मियांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करीतच या बैठकीची सुरुवात केल्याने बैठकीपूर्वी जाणवणारा तणावही पूर्णतः निवळला. या बैठकीतच मुस्लीम समाजातील काही तरुणांनी या प्रकरणात स्थानिक कोणाचाही सहभाग नसल्याने व संगमनेरात असे प्रकार घडणार नसल्याची खात्री व्यक्त करताना या घटनेच्या निषेधार्ह संगमनेर बंद ठेवून हिंदू-मुस्लीम जातीय सलोख्याचे दर्शन घडविण्याची सूचना केली. मात्र बंद सारख्या गोष्टींवर प्रशासनाने बोलावलेल्या बैठकीत चर्चा होवू शकत नसल्याने त्यावर बाहेर जावून चर्चा करण्यात आली.

यावेळी हिंदू व मुस्लीम समुदायातील मान्यवरांनी एकमेकांशी सविस्तर चर्चा केली. त्यातून गेल्या दोन वर्षात कोविडमुळे झालेली व्यापाराची हानी आणि सध्याच्या स्थितीत सणांमुळे त्याला मिळत असलेली थोडीफार उभारी याचा विचार करता सरसकट बंदचा निर्णय अयोग्य ठरेल असा मतप्रवाह समोर आला. त्यावर सर्वानुमते सरसकट बंद न पाळता संगमनेरातील सौहार्दाचे वातावरण कायम असल्याचा संदेश देण्यासाठी हिंदू-मुस्लीम समुदायाकडून संयुक्त निवेदन प्रसिद्ध करुन या घटनेचा जाहीर निषेध करण्याचे ठरले. त्यानुसार निवेदनही तयार करण्यात आले व शांतता समितीच्या बैठकीत त्याचे सर्वांसमोर वाचन करुन सर्वानुमते या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शांतता समितीने प्रसंगावधान राखून संगमनेरातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी बजावलेली भूमिका व दाखवलेल्या सामंजस्याने इतका स्फोटक प्रकार घडूनही संगमनेरातील सलोखा मात्र कायम राहिला.

या बैठकीत मुसिलम समाजाच्यावतीने रिझवान शेख. नूरमोहंमद शेख, डॉ.दानिश पठाण, शौकत जहागिरदार, शरीफ शेख मुफ्ती मौसिन शेख, तर हिंदू धर्मियांच्यावतीने माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, अ‍ॅड.श्रीराम गणपुले, प्रशांत वामन, कैलास वाकचौरे, अक्षय थोरात, कुलदीप ठाकूर, राजेंद्र देशमुख, साहेबराव वलवे आदिंसह दोन्ही समाजातील अनेकजण उपस्थित होते. याच बैठकीदरम्यान घडल्या प्रकराबाबत मुस्लीम बांधवांच्या भावना तीव्र असल्याने रविवारी समाजाच्यावतीने बंद पाळण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार रविवारी (ता.14) मुस्लीम बहुल भागात बंद पाळण्यात आला, त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. एकीकडे त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यातील काही शहरात उमटत असतांना संगमनेरात समोर आलेल्या संतापजनक घटनेनंतरही हिंदू-मुस्लीम बांधवांनी दाखवलेला सलोखा आजच्या स्थितीत राज्यासाठी आदर्श ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *