‘टॅग’ नसलेल्या जनावरांना बाजार समितीत विकण्यास ‘बंदी’
‘टॅग’ नसलेल्या जनावरांना बाजार समितीत विकण्यास ‘बंदी’
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांची शेतकर्यांसह व्यापार्यांना तंबी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही जनावरांचे मालक आपल्या जनावरांना टॅग मारून घेत नाही. तर काही मालक ते टॅग नंतर काढून टाकतात. अशा जनावरांना बाजार समितीमध्ये खरेदी-विक्रीसाठी बंदी घालण्यात येईल. तसेच त्या शेतकर्यांना शासनाच्या पशु प्रदर्शन आणि कर्ज प्रकरणातून वगळण्यात येणार असल्याची तंबी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी नुकतीच दिली आहे.

संगमनेर तालुक्यात दूध व्यवसाय व पशुधन मोठ्या संख्येने असून पशुधनासाठी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुधनामधील संसर्गजन्य लाळ, खुरकूत व सांसर्गिक गर्भपात या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. नुकतीच तालुका स्तरावरील समितीची बैठक तहसील कार्यालयात झाली त्यावेळी तहसीलदार निकम यांनी तंबी दिली. यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रशांत पोखरकर, डॉ.नितीन जोंधळे, डॉ.जे.के.तिटमे, डॉ.सुनील शिधोरे, डॉ.वर्षा शिंदे, डॉ.रवींद्र घोडके उपस्थित होते.

पुढे बोलताना तहसीलदार निकम म्हणाले, केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्व पशुपालक शेतकर्यांनी आपल्या जनावरांना टॅगिंग व लसीकरण करून घ्यावे. टॅग काढलेल्या जनावरांना बाजार समितीमध्ये विक्रीस बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तयार करून बाजार समितीला पाठवावा असे आदेशही तहसीलदारांनी निर्गमित केले. तसेच सर्व पशुवैद्यकांनी गाव पातळीवरील ग्रामविकास अधिकारी, तलाठी यांचे सहकार्याने केंद्र सरकारच्या या योजनेचा व्यापक पद्धतीने प्रचार करावा असे आवाहनही केले.
![]()
संगमनेर तालुक्यामध्ये 1 लाख 67 हजार 900 पशुधन आहे. तालुक्यात 24 पशुवैद्यकीय अधिकारी असून त्यांच्यामार्फत लाळ, खुरकूत रोगाचे लसीकरण सुरू केले आहे. जनावरांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येक जनावराच्या कानात टॅग मारून ते शासनाच्या अधिकृत प्रणालीवर ऑनलाईन करूनच 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या पंधरा दिवसांत लसीकरण करून घ्यावे.
– डॉ. प्रशांत पोखरकर (पशुधन विकास अधिकारी, संगमनेर)

