साईबाबांच्या कृपाशीर्वादाने पुन्हा गोव्याची सेवा करण्याची संधी ः डॉ. सावंत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन
नायक वृत्तसेवा, शिर्डी
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी (ता.24) पुन्हा शिर्डीला साई दरबारात हजेरी लावली. गोव्याची निवडणूक झाल्यावर मतमोजणीच्या आधीच ते शिर्डीला आले होते. साईंच्या आर्शीवादाने आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ, असा अशावाद त्यांनी त्यावेळी व्यक्त केला होता. त्यामुळे इच्छापूर्ती झाल्याच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी डॉ. सावंत यांच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा करण्यात आली. साईबाबा संस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे उपस्थित होते. त्यांनीही डॉ. सावंत यांना साईप्रतिमा भेट देत सत्कार केला. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, ‘गोव्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर आपण शिर्डीत आलो होतो तेव्हा गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी साईबाबांना साकडे घातले होते. बाबांच्या कृपाशीर्वादाने आपल्याला पुन्हा गोव्याची सेवा करण्याची संधी मिळाली. माझी ती इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे इच्छापूर्तीच्या निमित्ताने आपण पुन्हा शिर्डीत आलो आहोत.’
गोव्यातील पुढील कामकाजाबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘गोव्यात आता आम्ही नवीन व्हिजन डोळ्यासमोर ठेवून प्रगती करणार आहोत. गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकर्या उपलब्ध करणे, ग्रामीण, खासगी क्षेत्रात पर्यटनावर भर देणे, बंद असलेल्या खाणी पुन्हा सुरू करणे ही कामे केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्म निरर्भतेचे स्वप्न लक्षात घेऊन गोव्यात पर्यटन विकास केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाकडे झेपावत नवभारताची निर्मिती वेगाने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेनेही मोदींच्या सोबत राहणे उचित ठरेल,’ असा सल्लाही डॉ. सावंत यांनी दिला.