पोलिसांच्या मोहिमेमुळे शनिशिंगणापूरातून ‘लटकू’ हद्दपार ग्रामस्थ व भाविकांकडून कारवाईचे स्वागत; संपर्कासाठी पोलीस लावणार फलक

नायक वृत्तसेवा, नेवासा
प्रसिद्ध तीर्थस्थान असलेल्या शनिशिंगणापूरमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला ‘लटकूं’चा त्रास अखेर पोलिसांच्या मोहिमेमुळे हटला. पोलिसांनी मनावर घेतल्याने गाव आता ‘लटकू’मुक्त झाले आहे. या मोहिमेचे ग्रामस्थ व भाविकांकडून स्वागत होत आहे.

गावात व्यावसायिक स्पर्धा म्हणून दोनशेहून अधिक ‘लटकू’ पूजा साहित्य विक्रीसाठी रस्त्यावर असतात. वाहनांचा पाठलाग करून भाविकांना ठरावीक दुकानात घेऊन जाणे व गावात रस्ता अडवून पूजा साहित्य घेण्यासाठी दादागिरी होत होती. गावाची प्रतिमा मलिन होत असलेला हा प्रकार बंद होण्यासाठी यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. देवस्थानचे सुरक्षा रक्षक व पोलिसांना न घाबरता ‘लटकू’ कार्यरत होते.

गावातील मुख्य रस्त्यावर दोन ‘लटकूं’नी शुक्रवारी (ता.17) सहाय्यक फौजदार बाळू मंडलिक यांना मारहाण केल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी ‘लटकू हटाव’साठी विशेष पथक तयार करून धुलाई सुरू करताच रस्त्यावरील सर्व ‘लटकू’ एका दिवसांत हद्दपार झाले. ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवल्याने भाविकांच्या त्रासाची साडेसाती हटली आहे.

भाविकांची अडवणूक होऊ नये, याकरिता सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांना सक्त सूचना दिली आहे. पूजेचे ताट सर्वसाधारणपणे शंभर रुपयांना आहे. दिशाभूल व सक्ती होत असल्याने पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करणारे फलक लावणार आहे. यापुढे रस्त्यावर ‘लटकू’ दिसणार नाहीत.
सचिन बागूल (सहाय्यक पोलीस निरीक्षक)


शनि ग्रहदेवता असल्याने व्यावसायिक व ‘लटकू’ साडेसातीची भीती दाखवून फसवणूक करतात. बळजबरी व दादागिरीचा प्रकार अनेकदा अनुभवला आहे. रस्त्यावर पोलीस थांबल्याने आज कुठलाच त्रास झाला नाही.
– अक्षय उपाध्याय (इंदोर-मध्य प्रदेश)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *