संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी ओंकार सोमाणी तर उपाध्यक्षपदी ज्योती पलोड यांची बिनविरोध निवड

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर मर्चंट बँकेच्या अध्यक्षपदी ओंकार सोमाणी तर उपाध्यक्षपदी ज्योती पलोड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या उपस्थितीत बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात निवड प्रक्रिया संपन्न झाली. अध्यक्ष पदासाठी ओंकार सोमाणी यांचा एकमेव अर्ज तर उपाध्यक्ष पदासाठी ज्योती पलोड यांचा एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही पदाधिकार्‍यांची बिनविरोध निवड झाल्याचे राजेंद्र वाकचौरे यांनी जाहीर केले. अध्यक्ष पदासाठी सोमाणी यांचे नाव संतोष करवा यांनी सूचविले व त्यास दिलीप पारख यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी पलोड यांचे नाव प्रकाश कलंत्री यांनी सूचविले व त्यास राजेश करवा यांनी अनुमोदन दिले. नूतन अध्यक्ष सोमाणी यांचा सत्कार मावळते अध्यक्ष दिलीप पारख यांच्या हस्ते तर नूतन उपाध्यक्षा ज्योती पलोड यांचा सत्कार मावळते उपाध्यक्ष संतोष करवा यांच्या हस्ते करण्यात आला.

बँकेचे प्रमुख मार्गदर्शक राजेश मालपाणी यांनी नूतन पदाधिकार्‍यांना आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या आणि बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेला उंची मिळवून देण्यासाठी सर्व संचालक एक दिलाने प्रयत्नशील असतात. संस्थेच्या कारभारात कधीही राजकारण येऊ दिले जात नाही. संस्थेची वसुली ही अत्यंत चांगली आहे, त्यामुळे भक्कम नफा दिसतो. एकदिलाने पारदर्शी कारभार केल्याने बँकेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत चाललेला आहे. पन्नास कोटींचा स्वनिधी झाला की नेट बँकिंगची सुविधा देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्याचा बँकेचा प्रयत्न राहील. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा देण्यात मर्चंट्स बँकेने प्रगती केलेली आहे. मोबाईल बँकिंग हे अत्यंत सुरक्षित असल्याचे ग्राहकांना पटवून देण्यातही बँकेला मोठे यश मिळाले आहे. नूतन अध्यक्ष सोमाणी व उपाध्यक्षा पलोड यांची कारकीर्द देखील प्रगतीकडे नेणारी दिमाखदार आणि संस्मरणीय ठरेल असे राजेश मालपाणी म्हणाले.

शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा मालपाणी यांनीही आपल्या भाषणातून बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची स्तुती केली आणि नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. मावळते अध्यक्ष दिलीप पारख यांनी आपल्या छोटेखानी भाषणात आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळेच प्रगतीपथाकडे नेणारे कार्य करता आले असे ते म्हणाले. नूतन अध्यक्ष ओंकार सोमाणी यांनी आपल्यावर सर्वांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी सर्वांच्या सहकार्याने नक्कीच यशस्वीपणे पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. बँकेचा एकत्रित व्यवसाय दहा टक्क्यांनी वाढविण्याचा आपला प्रयत्न राहील असे ते म्हणाले. सर्वसामान्यांची आणि व्यापार यांची अर्थवाहिनी म्हणून लोकप्रिय असलेली मर्चंट बँक आता ग्रामीण भागातही शाखा उघडण्याच्या निमित्ताने प्रसार करण्याचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.

नूतन उपाध्यक्षा ज्योती पलोड यांनी आपल्या भाषणात बँकेच्या प्रगतीसाठी शंभर टक्के योगदान देण्याचा आपला निर्धार असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रकाश कलंत्री, प्रकाश राठी, संदीप जाजू, श्रीगोपाल पडताणी, कैलास सोमाणी, संतोष करवा, गुरुनाथ बाप्ते, संजय लाहोटी, सुमित मणियार, रचना मालपाणी, ज्योती कासट, विजूकाका पलोड, तुकाराम सांगळे डॉ.अर्चना माळी, डॉ.प्रमोद राजूस्कर, संजय करपे आदिंची समयोचित भाषणे झाली. यावेळी बँकेचे संचालक सुनील दिवेकर, ज्ञानेश्वर कर्पे, राजेंद्र वाकचौरे, संजय मेहता, सतीश लाहोटी, राजेश करवा, ओंकार बिहाणी, राहुल जगताप, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय बजाज आदिंसह रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या सदस्यांची चांगली उपस्थिती होती. शहरातील अनेकांनी नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षा यांचा सत्कार करून त्यांच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रकाश राठी यांनी तर आभार प्रदर्शन सीए संजय राठी यांनी केले.

Visits: 141 Today: 1 Total: 1590598

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *