आईला वाचविणार्‍या मुलाचा पित्याकडून खून सत्र न्यायालयाकडून पित्याला जन्मठेपेची शिक्षा

नायक वृत्तसेवा, शेवगाव
होळीच्या दिवशी दारू पिऊन घरी आलेल्या पतीला पत्नीने जाब विचारला. त्यामुळे संतापलेला पती तिच्या अंगावर धावून गेला. मात्र त्यांचा तरुण मुलगा मध्ये पडला आणि ते भांडण तेथे मिटले. परंतु हा राग डोक्यात ठेवून घराबाहेर पडलेल्या पित्याने त्याच रात्री आपल्या मुलाचा खून केला. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे ही घटना होती. या खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पिता गोरख उर्फ गोरक्षनाथ किसन कर्पे (वय 45 रा. आखेगाव, ता. शेवगाव) याला गुरुवारी (ता. 21) जन्मठेपेची शिक्षा दिली.

या प्रकरणात मृत मुलगा सोमनाथ (वय 18) याच्या आईने फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी 29 मार्चला आरोपी गोरख कर्पे दारू पिऊन घरी आला होता. त्यामुळे आज होळीचा सण असून तुम्ही सणासुदीच्या दिवशी दारू का पिवून आला? अशी विचारणा त्याला पत्नीने केली. याचा राग येऊन आरोपी तिला मारण्यासाठी अंगावर धावून गेला. त्यावेळी त्यांचा मुलगा सोमनाथ तेथेच होता. तो मध्ये पडला. त्यावर आरोपीने मुलालाही शिवीगाळ केली आणि निघून गेला. त्या रात्री मुलगा सोमनाथ आणि त्याची आई शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले. पहाटेपर्यंत त्यांचे पाणी भरण्याचे काम सुरू होते. सोमनाथ वरच्या बाजून पाणी सोडत होता, तर आई शेवटच्या टोकाला थांबून पाणी पोहचले का ते सोमनाथला सांगत होती. त्यांचे हे काम सुरू असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास सोमनाथ याचा ओरडल्याचा आवाज आला. त्यामुळे काय झाले, हे पाहण्यासाठी त्याची आई तेथे धावत आली. त्यावेळी आरोपी गोरख कर्पे त्याला लोखंडी गजाने मारत होता आणि मुलगा बेशुद्ध होऊन बांधावर पडला होता. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. आईने शेजार्‍यांच्या मदतीने मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

शेवगाव पोलीस ठाण्यात आरोपी कर्पे विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला अटक झाली. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांच्यासमोर झाली. हा खटला हा जिल्हा न्यायालयात जलदगतीने चालविण्यात आला. सरकारतर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन बी. पवार यांनी काम पाहिले. आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली.

Visits: 114 Today: 1 Total: 1102831

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *