संगमनेर शहरातील गुन्हेगारी वाढल्याने व्यापार्यांत असंतोष प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांना दिले निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील दिवसेंदिवस वाढणार्या चोर्या, दरोडे व गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रभारी पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांना निवेदन देत लक्ष वेधले आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संगमनेर शहर, उपनगरे व परिसरात चोरी, दरोडा व गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामध्ये वृध्द, महिला व लहान मुलांवर जीवघेणे हल्ले करुन गुन्हेगार पसार होत आहे. मोठी बाजारपेठ असल्याने लग्नसराईच्या काळात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दिवसा चोरी, दरोडे पडत आहे. त्यामुळे व्यापारी व जनतेमध्ये भीती पसरलेली आहे. मात्र, याकडे शहर पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसते आहे. पोलिसांचा वचक राहिलेला नसल्याचेच हे द्योतक आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षकांची त्वरीत बदली करुन सक्षम अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत एका आठवड्याच्या आत कार्यवाही केली नाही तर संगमनेर व्यापारी असोसिएशनच्यावतीने धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, सचिव शरद गांडोळे, सहसचिव जुगलकिशोर बाहेती, खजिनदार अरुण शहरकर, माजी अध्यक्ष श्रीगोपाळ पडतानी, शिरीष मुळे, प्रकाश कलंत्री, संचालक प्रकाश राठी, नरेंद्र चांडक, संजय कुटे, कपील टाक, प्रकाश वालझाडे आदी व्यापारी उपस्थित होते.
