पठारभागातील विद्यार्थांची स्पर्धा परीक्षांत उत्तुंग भरारी दोघांची जलसंपदा विभागात तर एकीची कॅनरा बँकेत निवड

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील पोखरी बाळेश्वर येथील तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ अक्षरशः आनंदाने भारावून गेले असून शुक्रवारी (ता.22) त्यांचा सत्कार करुन पाठीवर शाबासकीची थाप दिली.

एरव्ही संगमनेरचा पठारभाग म्हणल की नेहमीच दुष्काळी भाग म्हणून पाहिले जाते. परंतु अशा कठीण परिस्थितीतही पोखरी बाळेश्वर येथील अण्णासाहेब फटांगरे यांचा मुलगा आदर्श व भाऊसाहेब काळे यांची मुलगी प्रतीक्षा या दोघांचीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी सेवेमध्ये जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. तर विलास फटांगरे यांची मुलगी पल्लवी हिची आयबीपीएस परीक्षेतून ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर म्हणून कॅनरा बँकेत निवड झाली आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे पोखरी बाळेश्वर ग्रामस्थ अक्षरशः आनंदाने भारावून गेले आहे. या विद्यार्थ्यांचे कौतुक म्हणून ग्रामस्थ व प्रगती विद्यालयाने त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार शुक्रवारी सकाळी प्रगती विद्यालय येथे या यशस्वी विद्यार्थांचा फटाक्यांची आतिषबाजी करुन यथोचित सत्कार केला. तसेच तिन्ही विद्यार्थ्यांच्या आईवडीलांचाही सत्कार केला. यावेळी तिन्ही विद्यार्थ्यांनी यशापर्यंत पोहोचल्याचा संपूर्ण प्रवास कथन केला. या कार्यक्रमास एम. एम. फटांगरे, सरपंच सुनील काळे, शिवाजी फटांगरे, उपसरपंच ज्ञानदेव मधे, सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम फटांगरे, राघू जाधव, सतीष फटांगरे, बाळासाहेब फटांगरे, भाऊसाहेब काळे, विलास फटांगरे, प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक सतीश ढमाले, धुमाळवाडी शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर फटांगरे यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी!
पोखरी बाळेश्वर म्हटले की दुष्काळी भाग म्हणून या गावाकडे पाहिले जाते. पावसाळ्यातच संपूर्ण परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसते. मात्र उन्हाळ्यात येथील शेती पडीक होत असून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र अशा कठीण परिस्थितीतून या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
