कराटेच्या माध्यमातून आत्मरक्षणाचे धडे मिळतात ः मदने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण यश मिळविणार्‍या कराटेपटूंचा सन्मान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जीवनात खेळांना खूप महत्त्व आहे, एखाद्या आवडत्या खेळात स्वतःला झोकून देत नैपुण्य प्राप्त केले की त्यातून आपणास हवे ते मिळवता येते. पोलीस दलातील माझी सेवाही खेळातूनच सुरु झाली आहे. कराटेच्या माध्यमातून आत्मरक्षण करता येते. आज समाजात वाढलेल्या अपप्रवृत्ती लक्षात घेता मुलींनी कराटेचे प्रशिक्षण घेण्याची गरज निर्माण झाली आहे. छेडछाडीसारख्या घटनांना विरोध करण्यासह असे प्रकार वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश ठेवता येईल असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी केले.

गीता परिवाराच्या दैनिक कराटे प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी ब्लॅकबेल्ट परीक्षेत मिळविलेले यश व महाराष्ट्र दिनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत मिळविलेल्या पदकांच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी मंचावर गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, विष्णू तवरेज, दत्ता भांदुर्गे व प्रमोद मेहेत्रे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. संजय मालपाणी यांनी गीता परिवाराच्या माध्यमातून गेल्या 29 वर्षांपासून कराटे प्रशिक्षणाचे काम अव्याहत सुरु असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेची माहिती उपस्थितांना देताना कराटेचा समावेश या स्पर्धेत झाल्याचे सांगितले. मुलांनी दररोज किमान एकतास मैदानावर खेळलेच पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. भक्ती आणि शक्तीचा मिलाफ असलेल्या कराटेमध्ये प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश आनंददायी असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गेल्या महिन्यात 28 ते 30 एप्रिल दरम्यान कराटेच्या ब्लॅकबेल्टसाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यात गीता परिवाराच्या एकवीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून यश मिळविले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र दिनी पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतही गीता परिवाराच्या कराटेपटूंनी नेत्रदीपक कामगिरी करतांना 12 सुवर्ण, 14 रौप्य व 12 कांस्य पदकांची कमाई केली. त्यासर्वांना ओकिनावा मार्शल आर्टस अकादमीकडून प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. दत्ता भांदुर्गे यांनी प्रास्तविक केले, सचिन पलोड यांनी सूत्रसंचालन तर प्रमोद मेहेत्रे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला कराटेपटूंच्या पालकांसह निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 5 Today: 1 Total: 30466

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *