खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना 10 वर्षे सक्तमजुरी नगर शहरातील घटना; जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा निकाल
नायक वृत्तसेवा, नगर
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना 10 वर्षे सक्तमजुरी व 19 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी ठोठावली. दया ऊर्फ बांदू मच्छिंद्र नेटके (वय 23) व हरीश ऊर्फ कोंड्या मच्छिंद्र नेटके (दोघे रा. भारस्कर कॉलनी, लालटाकी, अहमदनगर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
आरोपींनी शेजारील रहिवासी तात्या खंडागळे यांचा मुलगा प्रकाश यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 26 नोव्हेंबर, 2019 रोजी रात्री घडली होती. दोन्ही आरोपींचे आपसांत भांडण सुरू होते. जखमी प्रकाश यांचा मुलगा व मुलगी घरात होते. त्यांना शिव्या ऐकू येत होत्या. त्यामुळे प्रकाश याने त्यांना, शिव्या देऊ नका, असे सांगितले. त्याचा राग येऊन नेटके बंधूंनी प्रकाशला जबर मारहाण केली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यात सरकार पक्षाचा युक्तीवाद, फिर्यादी, जखमी, वैद्यकीय अधिकारी डॉ. धानोरकर यांच्यासह सात जणांच्या साक्षी आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयांचे निवाडे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार बी. बी. बांदल यांनी सहकार्य केले. खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी धरत न्यायालयाने आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 5 महिने सक्तमजुरी, गंभीर दुखापत केल्याबद्दल पाच वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.