कोपरगाव आगारातून तांब्याची तार चोरणारे चोरटे गजाआड अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह चोरटे पकडले; नागरिकांतून पोलिसांचे कौतुक

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील बस आगाराच्या भांडार शाखेतून वस्तूंची चोरी करणार्या चोरट्यांस अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह गजाआड करण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश आले आहे. या कामगिरीबद्दल शहर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव बस आगारातील भांडार शाखेचा 17 एप्रिलला पहाटे अडीच-साडेतीन वाजेच्या सुमारास कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने 14 हजार 942 रुपयांची तांब्याची तार चोरून नेली.

याप्रकरणी बाबू तुळशीराम खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुरनं.90/2022 भादंवि 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना खबर्याकडून माहिती मिळाली की, अस्लम उमर कुरेशी याने ही चोरी केली आहे. त्यानुसार पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे, बी. एस. कोरेकर, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे, व्ही. एल. माशाळ यांनी आरोपीचा शोध घेऊन सोमवारी (ता.18) ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केली असता हा गुन्हा साथीदार समाधान प्रवीण पाटील याच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली. या माहितीवरून समाधान पाटील यालाही मंगळवारी अटक केली. दोघांची न्यायालयाकडून कोठडी घेतली असता त्यांच्याकडून 14 हजार रुपये किंमतीची 21 किलो तांब्याची तार हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक दारकुंडे हे करत आहे. दरम्यान धडाकेबाज कामगिरीबद्दल शहर पोलिसांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
