कोल्हार खुर्द येथील जुना पूला होणार जमीनदोस्त! सद्यस्थितीत नवीन बांधलेल्या पुलावरून वाहतूक सुरू
नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर – मनमाड महामार्गावर कोल्हार खुर्द येथे गेली कित्येक वर्षे वाहतुकीला साथ दिलेला कोल्हारचा जुना पूल येत्या 15 दिवसांत जमीनदोस्त होणार आहे. अखेर मंगळवारपासून (ता.19) या पुलाला पाडायला सुरुवात झाली. कालबाह्य झालेला हा पूल अनेक वर्षांपासून जीर्णावस्थेत होता. अनेक दिवसांपासून पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली होती. या पुलाच्याजवळ नवीन बांधलेल्या पुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे.
नगर – मनमाड महामार्गावर दक्षिणोत्तर असलेला प्रवरा नदीपात्रावरीलया जुन्या पुलाची कालमर्यादा केव्हाच संपली होती. पर्यायाने हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला होता. असंख्य वेळा या पुलाची डागडुजी, तात्पुरती दुरुस्ती करून हा पूल वापरात आणला जायचा. या पुलाच्या शेजारीच काही वर्षांपूर्वी नवीन पूल उभारण्यात आला. त्यावरून सद्यस्थितीत वाहतूक सुरू आहे. त्यामुळे कार्यक्षमता संपलेल्या या जुन्या पुलावरून गेल्या कित्येक दिवसांपासून अवजड वाहतूक बंद करण्यात आलेली होती. जुन्या पुलावरून केवळ पादचारी अथवा दुचाकी वाहने ये-जा करीत असत. हा जुना पूल आपल्या कालमर्यादेपेक्षाही अधिक वर्षे वाहतुकीला उपयोगी पडला.
अनेक वर्षे महामार्गावर वाहतुकीला साथ दिलेल्या या जुन्या पुलाला काल मंगळवार दि. 19 एप्रिल 2022 रोजी सकाळपासून पाडण्यास सुरुवात झाली. सध्या नगर – मनमाड महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत पूल भूईसपाट होईल. कोल्हार खुर्दच्या बाजूकडील सिद्धीबाबा मंदिराजवळील पुलाची एक बाजू मंगळवारी पाडण्यात आली. लवकरच हा जुना पूल संपूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येणार असून भूईसपाट झालेल्या या पुलाच्या जागी आणखी एक कमी उंचीचा नवीन पूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या जागी नवीन पूल उभारणीकामी एक वर्ष किंबहुना त्यापेक्षाही अधिक कालावधी लागू शकतो.
पूल पडल्याची अफवा…
कोल्हारचा जुना पूल पडल्याची अफवा मंगळवारी बर्याच ठिकाणी पसरली. पुलाच्या पडलेल्या भागाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. शेजारच्या नवीन पुलावरून ये – जा करणारे प्रवाशी देखील पूल आपोआप पडल्याचे बोलत होते. मंगळवारी दिवसभर याबाबत उलटसुलट चर्चा होती. मात्र खातरजमा केल्यानंतर संबंधित विभागाने कालबाह्य झालेला हा पूल पाडण्यास सुरुवात केल्याचे नागरिकांना समजले.