इनरव्हीलचा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा : तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
इनरव्हील ही जागतिक पातळीवर कार्यरत असणारी महिलांची संस्था असून समाजहिताचे उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. या संस्थेने डोंगर माथ्याच्या पायथ्याशी केलेलं वृक्षारोपण पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करील, असा विश्वास नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील खांडगाव येथील कपारेश्वर मंदिर परिसरात ऋषी पंचमीनिमित्त इनरव्हील क्लबच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा अर्चना बालोडे, सरपंच भारत गुंजाळ, इनरव्हीलच्या अध्यक्षा डॉ.दीपाली पानसरे, शॅम्प्रोचे संचालक सोमनाथ गुंजाळ, अॅड.मधुकर गुंजाळ आदी उपस्थित होते. विधायक उपक्रमातून समाजहित जोपासण्याचे काम इनरव्हील ही संस्था करीत आहे. डॉ.दीपाली पानसरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे चालू आहे. मैत्री, सेवा आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यातही संस्था अग्रेसर आहे. खांडगावच्या कपारेश्वर मंदिर परिसरात केलेल्या वृक्षारोपणातून निसर्ग फुलण्यास मदत होईल असे शेवटी नगराध्यक्षा तांबे म्हणाल्या.
