तिरळेपणावर शुक्रवारी मोफत शस्त्रक्रिया शिबिर संगमनेर रोटरी आय केअर ट्रस्टचा समाजोपयोगी उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्या रोटरी क्लब संगमनेरच्या अंतर्गत डोळ्यांच्या आरोग्यासंदर्भात महत्वपूर्ण काम करणार्या रोटरी आय केअर ट्रस्टचे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय संगमनेर, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती अहमदनगर, संगमनेर नगरपरिषद, पंचायत समिती, संगमनेर-अकोले शिक्षण विभाग व इतर सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी नेत्र रुग्णालय, नगरपालिका कंपाऊंड संगमनेर येथे तिरळेपणावरील मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सीए. संजय राठी, रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश गाडे, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन झंवर यांनी दिली आहे.
![]()
दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास तिरळेपणा असे संबोधले जाते, हा कुठलाही आजार नसून अनुवांशिकता, असंतुलित स्नायुशक्ती यामुळे हा दोष निर्माण होतो. याबद्दल कमी माहिती असल्याने बर्याचवेळा अशा व्यक्तींना सामाजिक दुष्परिणाम सहन करावे लागतात. तिरळेपणा असलेल्या मोठ्या मुलांना त्यांच्या वर्गमित्रांकडून अनेकदा हेटाळणी सहन करावी लागते. तिरळेपणात दुरुस्ती केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. स्वप्रतिमा आणि स्वतःविषयी आदर वाटतो. जेव्हा तिरळेपणा अधूनमधून येत असेल, तेव्हा शस्त्रक्रिया लग्नाचे वय झाल्यावर करता येते. चष्म्याची गरज नसेल आणि तिरळेपणासाठीचे दुसरे रोग निदान नसेल तर तिरळेपणासाठी शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. मात्र अशा शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने शस्त्रक्रिया करु न शकणार्या पालकांसाठी रोटरीच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे हे 117 वे तर रोटरी क्लब संयुक्त विद्यमाने हे चौथे शिबिर आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी, उपवर मुले – मुलींसाठी शुक्रवारी (ता.15) पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाणच्या निष्णांत डॉक्टरांचे पथक तपासणी करतील व शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांवर 16 व 17 एप्रिल, 2022 रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील. मागील वर्षी कोविड महामारीमुळे सदरचे शिबीर आयोजित करता आले नव्हते. या शिबिराचे हे चौथे वर्ष असून आत्तापर्यंत सुमारे 133 रुग्णांवर (229 डोळे) मोफत तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा सर्व स्तरातील रुग्णांनी लाभ घ्यावा, असे अवाहन प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी, प्रकल्प प्रमुख अजित काकडे, रोटरी क्लबचे सचिव हृषिकेश मोंढे, आय केअर ट्रस्टचे सचिव संजय लाहोटी, पुणे ट्रस्टचे सचिव राजेश पवार आदिंनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9623838296, 9420858738, 9922669801 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प समितीने केले आहे.
