कळसमध्ये आजी-माजी सैनिकांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान अंतर्गत पोलीस निरीक्षकांनी केला सत्कार


नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कळस बुद्रुक येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान अंतर्गत माजी सैनिक, पोलीस अधिकारी यांची ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढून अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतच्यावतीने ‘ मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियान अंतर्गत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये माजी सैनिक विजय वाकचौरे, गोरक्षनाथ वाकचौरे, मनोहर हुलवळे, विठ्ठल भुसारी, सचिन भुसारी, शिवाजी झोडगे, निवृत्ती वाकचौरे, वीरपत्नी सुंदर कानवडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शिवाजी वाकचौरे, विलास गवांदे यांचा सन्मान करण्यात आला. मेरी मिट्टी मेरा देशचे जिल्हा संयोजक म्हणून कळस गावचे सुपुत्र भाऊसाहेब वाकचौरे, आदर्श कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी विशेष संवाद साधला. ध्येय, चिकाटी असली की गरिबी आडवी येत नाही. त्यासाठी जिद्द असावी लागते, मी गरिबी अनुभवली आहे. आईवडिलांचे उपकार विसरता कामा नये. तीच शिदोरी माझ्या कामी आली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. अन्याय कधीही सहन करायचा नाही. मुलींना देखील आत्मनिर्भर होण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन केले.

यानिमित्ताने गावात विविध ७५ वृक्षांची अमृत वाटिका करण्यात आली. स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृतींचा शिलाफलक लावण्यात आला. यावेळी गणेश महाराज वाकचौरे, ग्रामसेवक कचरू भोर यांची भाषणे झाली. शिक्षिका संगीता दिघे यांनी पंचप्राणची शपथ दिली. आभार शिक्षक मच्छिन्द्र साळुंके यांनी मानले. उपसरपंच केतन वाकचौरे, सदस्य ज्ञानेश्वर वाकचौरे, देवराम महाराज वाकचौरे, डी. टी. वाकचौरे, यादवराव वाकचौरे, शांताराम वाकचौरे, रावसाहेब वाकचौरे, कळसेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता शेलार, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक काशिनाथ आंधळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संजय सोनवणे, माधव वाकचौरे, शंकर वाघमारे यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *