बनावट गाय छाप तंबाखू विकणारी आंतरराज्य टोळी गजाआड! सोलापूर पोलिसांची कारवाई; तपासाची व्याप्ती वाढण्याचीही शक्यता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरात विकल्या जाणार्या संगमनेरातील गाय छाप तंबाखूचे हुबेहुब बनावटीकरण करुन ते बाजारात विकणारी आंतरराज्य टोळी सोलापूर पोलिसांनी उघड केली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून गाय छाप तंबाखू बनविण्यासाठी लागणार्या साहित्यासह सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राज्यात विविध ठिकाणी छापेमारी करुन या प्रकरणातील मास्टरमाईंड रमेशकुमार गुप्ता याला विदर्भातील गोंदियातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता कामटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे सोलापूर प्रतिनिधी कैलास सोमाणी (रा.सोलापूर) यांना नियमीत भेटी दरम्यान मोहोळ तालुक्यातील कुरुल या गावातील एका दुकानात बनावट गाय छाप तंबाखूचे पुडे आढळून आले. त्यावरुन त्यांनी अधिक माहिती घेतली असता उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील एक इसम कंपनीचा अधिकृत ट्रेडमार्क असलेला लोगो वापरुन बनावट गाय छाप तंबाखू तयार करण्यासाठी हुबेहुब छपाई केलेले लेबल, त्यासाठीचा कागद, बोटम फोल्ड आणि बनावट दस्त आदींचा वापर करुन महाराष्ट्रात काही ठिकाणी त्याचे वितरण केल्याची व त्यातून ग्राहकांची फसवणूक करुन राज्य सरकारचा महसूल बुडवून आमच्या कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.
या प्रकरणाची व्याप्ती आंतरराज्य असल्याने सहाय्यक निरीक्षक मांजरे यांनी याबाबत सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांना सांगितला. त्यांनी सदर प्रकरणाचा तपास सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेत थेट आग्रा गाठले. तेथील मनोजकुमार उर्फ हिमांशू या इसमाला ताब्यात घेत त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तांत्रिक तपास करुन या प्रकरणाचा मास्टर माईंट रमेशकुमार गुप्ता (रा.गोंदिया) याच्या ठिकाणावर स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा घातला. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात गाय छाप तंबाखू तयार करण्यासाठीचे लेबल, पाकीटे, सुटी तंबाखू, इलेक्ट्रिक वजनकाटा, तयार करुन ठेवलेले गाय छाप तंबाखूचे पुडे यासह अन्य साहित्य असा एकूण 3 लाख 35 हजार 72 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणाचा तपास त्याचगतीने पुढे नेत पो.नि.पाटील यांनी सोलापूरातील रवीशंकर कोटा, व्यंकटेश नागनाथ कोटा, हनुमंत खुणे (करुल, ता.मोहोळ) व दौंड येथील संतोष सतीश शेळके याला अटक केली. या संपूर्ण कारवाईत पो.नि.पाटील यांच्यासह सहाय्यक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर, अंमलदार नारायण गोलकर, सलीम बागवान, रवी माने व चालक समीर शेख यांनी भूमिका बजावली. सदर प्रकरणात वरील सहा जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471, 482, 486, 487, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे करुन कोठडीची मागणी केली जाणार आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून राज्यासह परराज्यातील आणखी काही आरोपींच्या मागावर पोलीस असल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक रविंद्र मांजरे यांनी दिली.
मालपाणी उद्योग समूहाचा ‘गाय छाप तंबाखू’ संपूर्ण राज्यासह देशातील अनेक अन्य राज्यातही विकला जातो. त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीच्या प्रवृत्तींकडून असे प्रकार घडत असतात. मात्र कंपनीचे प्रतिनिधी सतत बाजारात सजग असल्याने असे प्रकार फारकाळ टिकू शकत नाहीत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींवर सध्या भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये कारवाई करण्यात आली असली तरीही तपासादरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींंवर सरकारचे उत्पादन शुल्क (एक्साईज) व वस्तू व सेवाकर (जीएसटी) या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बुडविल्याप्रकरणी गुन्हे दाखल होवून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.