रहा ठाम; विलिनीकरण होणारच! संगमनेर बस आगारातील कर्मचार्यांचा सूचक इशारा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 51 दिवसांपासून सुरु असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या दुखवट्याबाबत विविध नाट्यमय घडामोडी घडत असतांना व त्यातूनच सुरु असलेला दुखवटा संपल्याचे चित्र निर्माण केले जात असताना संगमनेर बस आगारातील सुमारे साडेतिनशे कर्मचार्यांनी आंदोलनाच्या आजच्या 51 व्या दिवशी बसस्थानकातच रांगोळी रेखाटून राज्यभरातील आंदोलकांना सूचक इशारा दिला आहे. या अभिनव प्रयोगातून दुखवटा संपला की काय? अन्य ठिकाणचे कर्मचारी कामावर परतले की काय अशा शंका निर्माण झालेल्या कर्मचार्यांना योग्य तो संदेशही मिळाला असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे. बस आगारात रेखाटलेल्या या रांगोळीतून ‘रहा ठाम विलिनीकरण होणारच’ असा संदेश देत येथील कर्मचार्यांनी जिल्ह्यातील बारा आगारांमधील आपल्या सहकार्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येत आहे.
तुटपुंज्या आणि अनियमित पगाराच्या कारणावरुन राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यातील 250 आगारातील लाखांहून अधिक कर्मचारी दिवाळीपासून आंदोलन करीत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात आंदोलन पुकारुनही आणि गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून एस. टी. बसेस बंद असूनही जनतेकडून त्या विरोधात चकारही उच्चारला जात नसल्याने एकप्रकारे या आंदोलनाला नागरिकांचाही मूक पाठिंबा असल्याचेच दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही अनियमित पगाराच्या तारखांसह अडीच ते पाच हजारांदरम्यान पगारवाढ, महागाई भत्ता अशा गोष्टीत सुधारणा करुन कर्मचार्यांचे आंदोलन संपविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे. त्यातच सदरचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयासमोर नेण्यात आल्याने कर्मचारी एकाचवेळी दोन आघाड्यांवर लढत आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने चौकशी समिती नियुक्त करुन 20 डिसेंबर रोजी त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने आपला सिलबंद अहवाल न्यायालयाला सादरही केला असून न्यायालयाने पुढील सुनावणी 5 जानेवारी रोजी ठेवली आहे. त्या अनुषंगाने एका संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह माध्यमांच्या समोर येत 20 डिसेंबर रोजी आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते. मात्र सध्या सुरु असलेले आंदोलन संघटना विरहित असल्याची बाब आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात सिद्ध केल्याने ‘त्या’ घोषणेनंतरही राज्यातील 243 आगारांसह जिल्ह्यातील बाराही बस आगारातील कर्मचारी अजूनही दुखावटा आंदोलनात सहभागी आहेत.
मात्र गेल्या 20 डिसेंबरनंतर राज्यातील काही घडामोडी घडून कर्मचार्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने त्यांचा गोंधळ उडू नये यासाठी संगमनेर आगारातील आंदोलक कर्मचार्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. कडकडीत बंद असलेल्या येथील आगाराच्या प्रशस्त प्रांगणात कर्मचार्यांनी ‘रहा ठाम विलिनीकरण होणारच’ असा मजकूर असलेली मोठी रांगोळी थाटली असून त्याद्वारे जिल्ह्यातील कर्मचार्यांना आंदोलन यशस्वी होणारच आहे, त्यासाठी 5 जानेवारीपर्यंत धीर धरण्याचा संदेशच देण्यात आला आहे. एस. टीच्या संपामुळे मोठ्या समस्या पेलणार्या सामान्य प्रवाशांनी या रांगोळीचे कौतुक केले असून एकप्रकारे आंदोलनाला पाठींबाच दर्शविला आहे.
राज्यभरातील आंदोलनासह संगमनेरातील वर्दळीचे आगार समजल्या जाणार्या संगमनेर बस आगरातील 350 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलना दरम्यानच पाथर्डीच्या वाहकाने संगमनेर बसस्थानकात आत्महत्या करण्याची घटनाही घडली होती. सध्या एकूण कर्मचार्यांमधील 23 कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी झाले असून उर्वरीत 327 कर्मचारी आळीपाळीने येथील आंदोलनाचा ज्योत तेवत ठेवीत आहेत.