देवळाली प्रवरा कोविड सेंटरवर चोरट्यांनी मारला डल्ला पाच लाखांचे पाईप व टीव्ही संचाची चोरी; पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांतून संताप
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील अनेक चोर्या आणि दरोड्यांचा तपास अद्याप लागलेला नसतानाच गुरुवारी (ता.7) रात्री येथील काकासाहेब चौकात बारवे जवळील नगरपरिषदेच्या कोविड सेंटरचे कुलूप तोडून आतील ऑक्सिजन पुरवठा करणारे तांब्याचे साडेचार ते पाच लाखांचे पाईप व टीव्ही संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. भरवस्तीमध्ये ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी येथील बाजारतळावरील दहा ते बारा दुकाने एकाच रात्री फोडली. त्यानंतर सोसायटी डेपोवरील तीन ते चार घरांची घरफोडी झाली. त्यानंतर रस्त्यालगत असणारे किराणा दुकान फोडले. या सर्वांचा तपास अद्याप लागलेला नसतानाच गुरुवारी रात्री येथील काकासाहेब चौकातील बारवेशेजारी असणार्या नगरपरिषदेच्या कोविड सेंटरमध्ये चोरी झाल्याने नागरिकांनी पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या कोविड सेंटरमध्ये 40 ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. मागील वर्षी करोनाच्या तीव्र लाटेमध्ये या सेंटरने अनेकांना जीवदान दिले. त्यानंतर करोनाची लाट सौम्य झाल्याने हे सेंटर गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या सेंटरच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कटावणीसारख्या हत्याराने कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये सीसीटीव्ही पाहण्यासाठी लावलेला संच चोरुन नेला. ही घटना नगरपरिषद कर्मचार्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी ही बाब मुख्याधिकारी अजित निकत यांना सांगितली. निकत व त्यांच्यासोबत बांधकाम अभियंता सुरेश मोटे यांनी येऊन संपूर्ण कोविड सेंटरची पाहणी केली असता सेंटरमध्ये दाखल होणार्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा 40 खाटांना पुरवठा करणार्या तांब्यांच्या पाईपची चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. एक ते दीड इंच व्यासाच्या या पाईपची लांबी दोनशे ते अडीचशे फूट असून याची अंदाजे किंमत साडेचार ते पाच लाख रुपये असल्याचे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले. तांब्याच्या पाईप बरोबरच चोरट्यांनी टीव्ही संच अंदाजे किमत वीस हजार रुपये चोरून नेला असल्याचेही आढळून आले. ही घटना शहरात पसरताच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नगरपरिषदेच्यावतीने पोलिसांत चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.