आता गुजरातची वाळू चक्क संगमनेरात? महसूलच्या डोळ्यात धूळफेक; मालट्रक पकडला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महसलूमंत्री झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर, अकोले व पारनेर तालुक्यातील वाळू तस्करी पूर्णतः नियंत्रणात आणली. त्यामुळे गोरख धंद्यातून मिळणारा अमाप पैसा बंद झाल्याने बैचेन झालेल्या वाळू तस्करांनी आता रात्रीच्या अंधारात वाळू चोरीसह चक्क परराज्यातून वाळू आणल्याचा बनाव करण्यास सुरुवात केली आहे. हे सिद्ध करणारी घटना संगमनेरातून समोर आली असून महसूलच्या पथकाने कारवाई करीत नगरची नोंदणी असलेला बारा टायरचा मालट्रक पकडला असून त्यात तब्बल साडेपाच ब्रास वाळू असल्याचे समोर आले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून संगमनेर, अकोले व पारनेर या तीन तालुक्यातील वाळू तस्करीवर लक्ष्य केंद्रीत करीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करीवर लगाम लावला आहे. अर्थात रात्रीच्या अंधारात आणि दिवसा गाढवांचा वापर करुन आजही ही तस्करी कमी-अधिक प्रमाणात सुरुच आहे. मात्र यात कारवाई होण्याचा धोका अधिक असल्याने सराईत वाळू चोर वगळता अन्य तस्करांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भूमिका स्वीकारल्याचेही दिसत आहे. तर काहींनी अन्य ठिकाणचे वाहन भासावे व त्यातून आपले उखळ पांढरे व्हावे यासाठी इतर ठिकाणी नोंदणी झालेल्या वाहनांचा वापर करुन वाळुची तस्करी करण्याच्याही क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे.

असाच प्रकार आज (ता.04) सकाळी संगमनेर शहराजवळील ढोलेवाडी परिसरातून समोर आला आहे. या रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणार्‍या एका बाराचाकी मालट्रकवर (क्र.एम.एच.16/सी.सी.3457) संशय आल्याने महसूलच्या पथकाने चौकशीसाठी त्याला थांबवले. यावेळी केलेल्या तपासणीत सदरच्या मालट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू असल्याचे त्यांना दिसले. सदरची वाळू कोठून आणली याबाबत वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने गुजरातमधील वापी येथून वाळू आणल्याचे थातुरमातूर उत्तर देवून स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत वरीष्ठांना याबाबत माहिती देवून सदरचा मालट्रक वाळूसह ताब्यात घेतला आहे व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.

संगमनेरपासून गुजरातमधील वापीचे अंतर जवळपास 210 किलोमीटर इतके आहे. इतक्या दूरवरुन आणलेल्या वाळुची प्रतिब्रास किंमत किती होईल? संगमनेर तालुक्यातील जवळपास अर्धाडझन स्रोतांमधून होणार्‍या तस्करीतील वाळूच्या दराची कथित गुजरातमधून आणलेल्या वाळूच्या किंमतीशी तुलना होवू शकेल काय? इतक्या महागाची वाळू घेण्याइतपत संगमनेर तालुक्यात वाळूचा दुष्काळ आहे का? अशी अनेक प्रश्न त्या वाहनाच्या चालकाला विचारण्यात आले. मात्र यातील एकाही प्रश्नाचे त्याला उत्तर देता आले नाही. त्यातच गुजरातमधून वाळू आणल्याबाबत त्याच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे नसल्याने तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशाने सदरचे वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Visits: 110 Today: 1 Total: 1106571

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *