शिर्डीमध्ये श्रीराम नवमी उत्सवाला भक्तीमय वातावरणात सुरुवात संस्थान अध्यक्ष काळेंच्या प्रमुख उपस्थितीत निघाली मिरवणूक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांच्या पुण्यभमीत यंदाच्या 111 व्या श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरण सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने शनिवारी (ता.9) सकाळी श्री साईबाबा संस्थान अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळेंच्या प्रमुख उपस्थितीत श्रींची प्रतिमा, वीणा व पोथीची मिरवणूक काढण्यात आली.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने तीन दिवसीय श्री रामनवमी उत्साहास प्रारंभ झाला असून शनिवारी पहिल्या दिवशी साई संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांनी श्रींच्या पोथीची मंदिरातून द्वारकामाईत मिरवणूक काढली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत व विश्वस्त अॅड. सुहास आहेर यांनी प्रतिमा आणि अविनाश दंडवते वीणा घेवून सहभागी झाले होते.
याप्रसंगी विश्वस्त सर्वश्री सचिन गुजर, राहुल कनाल, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच श्री रामनवमी उत्सवानिमित्त द्वारकामाई मंदिरात अखंड पारायणास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचे वाचन संस्थानचे अध्यक्ष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी चैताली काळे यांनी केले. तसेच श्री साईबाबा समाधी मंदिरात त्यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व परिसरात उडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशूर साईभक्त सदाशिब दास यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट व शिंगवे येथील ओम साई लाईटिंग डेकोरेटर्स नीलेश नरोडे यांच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आली.