शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी गुंतवणुकीची गरज ः तुपे अकोले येथे लोकनेते आदिक यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकरी परिसंवाद
नायक वृत्तसेवा, अकोले
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्नात 40 टक्के वाटा कृषी उत्पन्नाचा होता. तो आता घसरून 16 टक्केवर आला आहे. त्यामुळे शेती व्यवसायाला चालना द्यायची असेल तर शेती व्यवसायात गुंतवणूक झाली पाहिजे. तसेच अदानी, अंबानी यांना कोणतेही विशेष अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांची धास्ती घेण्याचे काहीही कारण नाही. शेतकर्यांनी उठाव केला तर अदानी, अंबानी त्यांच्यापुढे काहीच नाही. तसेच राज्यकर्ते शेतकर्यांच्या विरोधात गेले तर भूमिपुत्र त्यांना वाकविल्याशिवाय राहणार नाही हे सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलकांनी दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा कृषी अभ्यासक अशोक तुपे यांनी केले.
अकोले येथे रासने कॉम्प्लेक्समधील राघव हॉलमध्ये आयोजित लोकनेते गोविंदराव आदिक यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकरी परिसंवादामध्ये ‘केंद्र सरकारचे नवे कायदे काय सांगतात?’ या विषयावर मत व्यक्त करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे होते. यावेळी सीताराम भांगरे, महेश नवले, प्रदीप हासे, संपत वाकचौरे, सोन्याबापू वाकचौरे, प्रमोद मंडलिक, प्रा.बी.एम.महाले, अॅड.के.बी.हांडे, खंडूबाबा वाकचौरे, अॅड.भाऊसाहेब गोडसे, अशोक मंडलिक, बबन तिकांडे, रामहरी तिकांडे, मच्छिंद्र मंडलिक, अॅड.जोरवर, बाळासाहेब वडजे, सुनील धुमाळ, सुनील जाधव, अनिल कोळपकर, चंद्रकांत नेहे, नानासाहेब दळवी, भाऊसाहेब चासकर, धनंजय संत, परशुराम शेळके, प्रा.केशव नाईकवाडी, दत्ता रत्नपारखी, रामलाल हासे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना तुपे म्हणाले, शेतीमालाच्या आधारभूत किंमती ठरवताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची स्थिती, बफर स्टॉक व इतर बाबी लक्षात घेऊन ठरविल्या जातात त्याला कायद्याचा आधार नाही. त्यामध्ये कामाचे, घामाचे दाम धरले जात नसून फक्त खर्चाचे दाम धरले जातात. शेती व्यवसाय हा उधार उसनवारीवर चालू असल्याने शेतकरी तोट्यात येत आला आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुतंवणूक गरजेची झाली आहे. आत्तापर्यंत सत्तेवर असलेल्या कोणत्याही सरकारने स्वामिनाथन आयोग पुढे नेला नाही. शेती संशोधन ठप्प झाले असून तस्करी वाढली असल्याचे तुपे म्हणाले.
ज्यावेळी स्पर्धा संपते त्यावेळी व्यापार संपतो व शेतकरी अडचणीत येतात. शेतीचे राजकीयकरण झाल्याने शेती व्यवसायाचे वाटोळे झाले आहे. याला काही प्रमाणात माध्यम जबाबदार असून ज्याठिकाणी उत्पन्नाचे साधन नाही, त्या क्षेत्राकडे माध्यम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे शेतकरी, दीनदुबळे, वंचित लोकांनी वृत्तपत्र नाही वाचले तरी चालेल, असे धोरण माध्यमांनी घेतले आहे. आणि सर्वात मोठी समस्या ही कुटुंबात एक मूल हे धोरण घेतल्याने शेती करायला कोणी राहिले नाही. त्यामुळे करार पद्धती ही पुढे आली असून ती गरज झाली आहे. यावेळी अॅड.वसंत मनकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करून शेतकरी विषयक तीन कायदे कसे फायदेशीर आहे याची मुद्देसूद मांडणी करत कायदाच रद्द करा असे म्हणणे लोकशाहीला घातक असल्याचे म्हणाले. डॉ.अजित नवले म्हणाले, देशातील 208 शेतकरी संघटनांनी या शेतकरी कायद्यांना विरोध केला असून त्यामध्ये भाजपला मानणार्या अनेक संघटना या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. हे कायदे सर्व जनता कोरोनाच्या काळात घरात असताना का आणले? यावर चर्चा का करण्यात आली नाही. शेतकरी नेते दशरथ सावंत म्हणाले, सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी राजू शेट्टी आणि नरेंद्र मोदी कोल्हापूरच्या सभेत एका व्यासपीठावर बसलेले असताना सत्तेवर आल्यावर एका महिन्यात स्वामिनाथन आयोग लागू करू म्हणणारे मोदी सत्तेत आल्यानंतर या आयोगाची अंमलबजावणी करणे शक्य नाही सांगतात. ही व्यक्ती अतिशय खोटरडी असून त्यांनी सर्वांचा विश्वासघात केला आहे. स्वागत अगस्ति कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी करून कार्यक्रमाच्या निमित्ताने स्व.गोविंदराव आदिक यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. किशोर देशमुख यांनी आता उठवू सारे रान हे गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन व आभार नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केले.