कृष्णा महाराज मते होणार देवगड संस्थानचे उत्तराधिकारी महंत भास्करगिरी महाराजांनी केली उत्तराधिकार्याची नियुक्ती
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून कृष्णा महाराज मते यांची नियुक्ती केली आहे. त्यांचा दिक्षाविधी सोहळा 6 मे, 2022 रोजी श्री क्षेत्र देवगड येथे पार पडणार आहे. याबाबत महंत भास्करगिरी महाराज यांनी माहिती दिली.
सन 1975 मध्ये श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे समाधीस्थ होण्याआधी किसनगिरी महाराज यांनी त्यांचा उत्तराधिकारी या नात्याने महंत भास्करगिरी महाराजांची निवड केली होती. भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड देवस्थानची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. तीच गुरू परंपरा चालवत कृष्णा महाराज मते यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय भक्त मंडळींच्या संमतीने घेण्यात आला असल्याचे भास्करगिरी महाराजांनी सांगितले.
गुरू परंपरेनुसार श्री कृष्णा महाराज मते यांचा उत्तराधिकारी पंच संस्कार दीक्षा सोहळा श्री श्री श्री 1008 शिवानंदगिरीजी महाराज श्री क्षेत्र मंजूर (ता. कोपरगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मे रोजी होणार आहे. यावेळी महंत देवेंद्रगिरी महाराज (गुजरात), श्री महंत वेदव्यास पुरी महाराज, इंद्रजीत भारती महाराज आदी संत-महंत उपस्थित राहणार आहेत. यादिवशी होमहवनादी नामकरण विधी, अग्निहवन, पवित्र जलाभिषेक, पंचगुरू संस्कार विधी आदी कार्यक्रम होतील. सकाळी 9 ते 11 सावखेडा येथील गिरी आश्रमाचे कैलासगिरी महाराज यांचे कीर्तन होईल. ब्रम्हवृंदाचा शांतीपाठ, श्रींची आरती होऊन महाप्रसाद वाटपाने सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी या सोहळयाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
कृष्णा महाराज नेवासा तालुक्याचेच भूमिपूत्र..
कृष्णा महाराज मते (वय 38) यांचा जन्म नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथे झाला असून त्यांचे भेंडा येथील जिजामाता विद्यालयात 12 वीपर्यंत (विज्ञान) शिक्षण झाले आहे. आळंदी येथे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर वृंदावन येथे दोन वर्षे श्रीमद्भागवत कथा अभ्यास करून सलग पाच वर्षे पंढरपूर येथे चातुर्मास केले. त्यानंतर गणेशखिंड (ता. श्रीरामपूर) येथे असलेल्या हनुमानगड संस्थान येथे सलग नऊ वर्षे जबाबदारी सांभाळली.