कोरोना महामारीमध्ये शिंगणापूरच्या डॉक्टरांचे माणुसकीचे दर्शन

कोरोना महामारीमध्ये शिंगणापूरच्या डॉक्टरांचे माणुसकीचे दर्शन
आईच्या वर्षश्राद्धनिमित्त दिवसभर येणार्‍या रुग्णांची केली मोफत तपासणी
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येच्या वाढीने पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोपरगाव तालुक्याने देखील कोरोना रुग्णसंख्येत 1600 चा आकडा पार केला आहे. तर 29 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. यामुळे राज्यभरासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा आपल्या जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहे. यातच तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ.विजय काळे यांनी आपल्या आईच्या 15 व्या वर्षश्राद्धनिमित्त बुधवारी (ता.23) दिवसभर शिंगणापूर येथील श्रद्धा क्लिनिकमध्ये येणार्‍या रुग्णांची मोफत तपासणी करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे.


डॉ.विजय काळे हे फॅमिली फिजिशियन आणि बालचिकित्सक असून गेल्या 20 वर्षांपासून शिंगणापूर येथे श्रद्धा क्लिनिक मध्ये रुग्णांवर उपचार करतात. दरम्यान, डॉ.काळे यांच्या मातोश्री स्व.छबुबाई दादा काळे यांचे 23 सप्टेंबर, 2005 रोजी निधन झाले. स्व.छबुबाई यांनी काबाड कष्ट करत आपल्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी डॉ.काळे हे आईचे वर्षश्राद्ध न करता घरगुती पद्धतीने आईच्या प्रतिमेची पूजा करत आईचे ऋण म्हणून आपल्या क्लिनिकमध्ये दिवसभर येणार्‍या रुग्णांची मोफत तपासणी करतात. बुधवारी डॉ.काळे यांनी सुमारे 45 ते 50 रुग्णांची मोफत तपासणी करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडविले आहे. गेल्या 15 वर्षांपासून ते आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मृतीदिनी ते रुग्णांची मोफत तपासणी करत योग्य ते मार्गदर्शन करतात.


तर दुसरीकडे तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर देखील न घाबरता डॉ.काळेंनी आपला मोफत उपचारांचा वसा बाराव्या वर्षी देखील नियमित सुरू ठेवल्याने समाजाच्या सर्व स्तरांतून मोठे कौतुक होत आहे. तसेच तपासणी करुन घेतलेल्या रुग्णांनीही आभार मानत ते आमच्यासाठी ‘देवदूत’ असल्याची भावना व्यक्त केली.

Visits: 8 Today: 3 Total: 30122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *