मंदिरातील दानपेट्या फोडणार्या दोघांना शिताफीने पकडले ! अकोले पोलिसांची दमदार कामगिरी, एकजण फरार; 80 हजारांचा मुद्देमाल जप्त..

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यात चोर्यांचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी मंदिरातील दानपेट्यांसह इतर साहित्यांना लक्ष्य केलेले आहे. या पार्श्वभूमीवर अकोले पोलिसांनी वरीष्ठ अधिकार्यांच्या सूचनांनुसार रात्रीची गस्त वाढवली असता सोमवारी (ता.13) रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रवरा नदीतिरावर असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसरात तिघे संशयित फिरत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. तर एकजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकींसह चोरलेला ऐवज असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोर्यांचे सत्र सुरू आहे. मंदिरातील दानपेट्या फोडून रोख रक्कमेसह इतर वस्तू लांबविण्याचा अक्षरशः धडाका उठवून दिला आहे. याबाबत वरीष्ठ अधिकार्यांनी स्थानिक पोलिसांना कडक पावले उचलण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार अकोले पोलिसांनी रात्रीची गस्त देखील वाढवली आहे. सोमवारी (ता.13) रात्री 11 वाजेच्या सुमारास प्रवरा नदीतिरावरील महालक्ष्मी मंदिर परिसरात तिघे संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ आणि राजू ठमा मेंगाळ (दोघेही रा.उंचखडक खुर्द) यांना मोठ्या शिताफीने पकडले. तर तिसरा सहकारी विलास लक्ष्मण गावंडे हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे.

पोलिसांनी वरील दोघांकडून चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कटावणी, ग्राईंडर, दोन दुचाकी, चोरलेली रोख रक्कम, 1 अॅम्प्लीफायर, 2 साऊंड, 1 दानपेटी असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाज जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुरनं. 352/2021 भादंवि कलम 379, 511 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.
![]()
दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दाखल गुन्हे गुरनं.352/2021 भादंवि कलम 379, 511 प्रमाणे मधीलक्ष्मी माता मंदिर अकोले, गुरनं.356/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे दत्त मंदिर रुंभोडी, गुरनं.354/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे अंबिका माता मंदिर गणोरे आणि गुरनं.306/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे अंबाबाई मंदिर टाहाकारी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोलीस नाईक अजित घुले, विठ्ठल शेरमाळे, बाळासाहेब गोराणे, गोविंद मोरे, रवींद्र बलवे, आनंद मैड, गणेश शिंदे, प्रदीप बढे, आत्माराम पवार, संदीप भोसले, नागरे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
कोविड संकटामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यातच अकोले तालुक्यात व संगमनेर हद्दीजवळ चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने भीती पसरलेली आहे. पोलिसांनी चोरट्यांची टोळी पकडून नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. परंतु, रात्रीची गस्त अशीच सुरू ठेवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा असा सूर नागरिकांतून उमटत आहे.

