जीवदया पांजरपोळमधील कालवडीवर बिबट्याचा हल्ला
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यात बिबट्यांचा मोठा संचार वाढण्याबरोबर हल्लेही वाढत आहेत. शुक्रवारी (ता.9) मध्यरात्रीच्या सुमारास सायखिंडी शिवारातील जीवदया पांजरपोळच्या आवारात बिबट्याने प्रवेश करत एका कालवडीचा फडशा पाडल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभागासह बागायती क्षेत्रात बिबट्यांचा संचार वाढला आहे. पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ले करत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. शुक्रवारीही जीवदया पांजरपोळमध्ये अंधाराचा फायदा घेत बिबट्याने प्रवेश करत एका कालवडीला भक्ष्य बनवले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. या संस्थेत साधारण लहान-मोठी बाराशेहून अधिक जनावरे आहेत. त्यामुळे संस्थेसह परिसरातील शेतकर्यांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी केली आहे.