मोदी सरकारची जुलूमशाही देशाने कधीही बघितली नाही ः आ. डॉ. तांबे वीरगाव फाटा येथे इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसचा रास्ता रोको
नायक वृत्तसेवा, अकोले
दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांत केंद्र सरकारविषयी प्रचंड संताप असून, अशी जुलूमशाही या देशाने कधीही बघितली नसल्याची घणाघाती टीका नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.
अकोले तालुक्यातील वीरगाव फाट्यावर अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने बुधवारी (ता.6) पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि महागाई विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवर टीका केली. हे काँग्रेसचे आंदोलन नसून हा जनतेचा आक्रोश आहे. करोना कालावधीत त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारकडून मदतीऐवजी वाढत्या महागाईची भेट मिळाली. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गॅसमध्ये मोठी दरवाढ करून केंद्र सरकारने महिलांची फसवणूक केली. खोटी आश्वासने देऊन स्वतःची छबी छान बनविणे एवढेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. ते महागाईवर का बोलत नाहीत? असाही सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात करोनाच्या दोन वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचे कर्ज माफ केले. अर्थसंकल्पामध्येही नियमित कर्ज भरणार्या 20 लाख शेतकर्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे 10 हजार कोटींची मदत केली. देशापुढील शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी, विजेचे प्रश्न याबाबत केंद्राकडून कुठलेही धोरण नाही. सरकार विरोधात बोलणाराला तुरुंगात डांबले जाते, चौकशा लावल्या जातात. या विरोधातही काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा आमदार डॉ. तांबे यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक मधुकर नवले, तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, एन.टी.सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास चव्हाण, कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, संगमनेर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक संभाजी वाकचौरे, संपत वाळुंज, चंद्रमोहन निरगुडे, मंदा नवले, महिलाध्यक्षा सौ.निरगुडे, माणिक अस्वले, देवराम कुमकर, अशोक माळी, साईनाथ घोरपडे, मावंजी आगिवले, रमेश बोडके, बजरंग तोरमल, एकनाथ सहाणे, संदीप कर्णिक, संतोष चव्हाण, संतोष वाकचौरे, प्रशांत अस्वले, दत्ता दळवी यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते सहभागी होते. सुमारे एक तास हे रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने सिन्नर-अकोले-संगमनेर रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी लक्षात घेता हे आंदोलन आटोपते घेण्यात आले.