वैद्यकीय अधिकार्‍यांनी पत्नीची प्रसूती केली शासकीय रुग्णालयात अकोले ग्रामीण रुग्णालयात उत्तम आरोग्य सुविधा असल्याचा दिला संदेश

नायक वृत्तसेवा, अकोले
साधारणतः लोक शासकीय, ग्रामीण रुग्णालयांची दुरावस्था व समाजातील प्रतिष्ठेमुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यास जात नाही. मात्र अकोले ग्रामीण रुग्णालयात असलेली उत्तम सुविधा व तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धीमुळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांनी स्वतःच्या पत्नीची प्रसूती अकोले ग्रामीण रुग्णालयात करून तालुक्याची आरोग्य व्यवस्था उत्तम असल्याचा संदेश दिला आहे.

अकोले हा आदिवासी तालुका म्हणून गणला जातो. यामुळे मोठ्या संख्येने गर्भवती माता प्रसूतीसाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल होतात. येथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध असल्याने तालुक्याच्या कानाकोपर्‍यातून गर्भवती माता येथे दाखल होतात. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे व डॉ. पोपेरे हे तिघेही स्त्रीरोग तज्ज्ञ असल्याने महिला विश्वासाने उपचारार्थ दाखल होतात. मात्र, शासकीय रुग्णालयात उपचार घेणे म्हणजे कमीपणाचे लक्षण असल्याचा अनेकांचा समज आहे. त्यामुळे अनेकदा शासकीय उपचार घेण्याकडे कानाडोळा करतात. परंतु, कोविडमध्ये शासकीय रुग्णालयांनी दर्जेदार उपचार करुन अनेक रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे. याच बळावर स्वतः वैद्यकीय अधिकार्‍यांनी आपल्या पत्नीची प्रसूती येथेच केली आहे.

अकोले ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था उत्तम असल्याने येथे दरमहा 25 ते 30 प्रसूती होत असतात. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी विश्वासाने उपचार करण्यासाठी यावे, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांनी केले आहे. तर स्वतःच्या पत्नीची प्रसूती येथे केल्याने शासकीय वैद्यकीय सुविधा उत्तम असल्याचा संदेशही दिला आहे.

Visits: 144 Today: 1 Total: 2129462

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *