‘तीनबत्ती’ प्रकरणात संगमनेर पोलिसांना मिळाले पहिले यश! आज पहाटे चौघांच्या ‘मुसक्या’ आवळल्या; पोलीस कोठडीत रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तीनबत्ती पोलीस हल्ला प्रकरणात संगमनेर पोलिसांना पहिले यश आले असून उपलब्ध झालेल्या व्हिडिओ फुटेज मधून निष्पन्न झालेल्या चार जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंतच्या तपासात पोलिसांनी विविध चलचित्रांमधून 22 पेक्षा अधिक आरोपींना रेखांकीत केले असून त्यातील चार जणांना अटक झाल्याने उर्वरीत आरोपींचा छडा लावण्याचा पोलिसांचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे. अटक केलेल्या चारही आरोपींना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी एक दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठविले आहे.

गुरुवारच्या या घटनेनंतर संपूर्ण संगमनेर शहरातून संताप व्यक्त होत होता. प्रचंड प्रादुर्भावातही धार्मिक कारणास्तव पोलिसांनी सशर्त परवानगी दिल्यानंतर ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याची ज्यांची होती ते देखील या हिंसाचाराच्या वेळी तिकडे फिरकले नाहीत. खरेतर त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची गरज आहे. कोविडच्या संकटात संगमनेरचं नावं राज्यात खराब करणार्या या घटनेच्या मूळाशी जाण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक आरोपी चिन्हीत करुन त्याला गजाआड करण्याची आवश्यकता आहे. या घटनेनंतर संपूर्ण संगमनेरातही संताप निर्माण झाल्याने पोलिसांवरील दबाव वाढला होता. त्यामुळे गुरुवारी रात्रभर पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासून त्यातून 22 पेक्षा अधिक आरोपींची ओळख पटविली आहे.

त्यांच्या अटकेसाठी शुक्रवारी सकाळपासूनच छापासत्र सुरु करण्यात आले आहे. मध्यरात्री उशीरा यातील काही आरोपी घरी असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोलीस पथकासह छापे घालून मुसेब अलाउद्दिन शेख (वय 31, रा.अपनानगर), आसिफ मेहबूब पठाण (वय 31, रा.मोगलपूरा), सय्यद युनूस मन्सूर (वय 24, रा.गवंडीपूरा) व मोसीन इमाम शेख (वय 35, रा.जम्मनपूरा) या चौघांना अटक केली. आज दुपारी त्यांना संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे केले असता त्यांनी या चौघांनाही एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांच्या बाजूने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवस कोठडीत पाठविण्याची विनंती केली.

मात्र बचाव पक्षाने पोलिसांकडे व्हिडिओ चित्रणाच्या क्लिप्स व सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध असतांना आरोपी निष्पन्न करण्यासाठी कोठडीची गरज नसल्याचा बचाव केला. दोन्ही बाजू ऐकल्यावर न्यायालयाने चारही आरोपींना एक दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस तपासातून आत्तापर्यंत 22 पेक्षा अधिक जणांची ओळख पटली आहे. मात्र अटकेच्या भितीने त्यातील बहुतेकजण पसार झाले आहेत. या गुन्ह्यात आरोपींना गजाआड करण्यापेक्षा ते निष्पन्न करण्याकडे पोलिसांचा कल अधिक आहे. हाती आलेल्या या चौघांच्या चौकशीतून पोलिसांना अन्य संशयीतांसह इतरही गोष्टींची उकल करता येणार आहे. त्यामुळे चार आरोपींच्या अटकेने या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार हे निश्चित आहे.

गेल्या गुरुवारी (ता.6) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास मोगलपूरा भागात रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. यावेळी अहमदनगर मुख्यालयाकडून बंदोबस्तासाठी आलेल्या स्ट्राईकींग फोर्सचे पथक तेथे पोहोचले. संगमनेरात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतांना आणि राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू असतांनाही मोठ्या प्रमाणावर नागरिक सामाजिक अंतर आणि मास्क या नियमांना धुडकावून वावरत असतांना पाहून फोर्सच्या जवानांनी तेथून गर्दी हटविण्यास सुरुवात केली. यात पो.कॉ.सलमान शेख, पो.कॉ.प्रशांत केदार व भागीरथ देशमाने हे जवान कर्तव्य बजावण्यात आघाडीवर होते.

स्ट्राईकींग फोर्सचे जवान नियम पाळा, घरी जा असे सांगत असतांनाही एक मोठा समूह त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या जवानांनी त्यांना काठीचा धाक दाखवला आणि येथूनच ‘तीनबत्ती’ प्रकरणाची ठिणगी पेटली. काहींनी जमावाचा फायदा घेत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हा प्रकार सुरु असतांना परिसरातील सर्वच नागरिक तेथे गोळा झाल्याने मुठभर पोलिसांना तेथून माघार घ्यावी लागली. याच दरम्यान काहींनी पोलीस वाहनांवर दगडफेकही केली. मात्र सरकारी वाहनांच्या काचांना जाळ्या बसवण्याची पद्धत असल्याने त्यातून ही वाहने बचावली, मात्र रस्त्याने जाणार्या एका खासगी बसची काच फुटण्यासह अन्य काही वाहनांचेही नुकसान झाले. त्यातील एका वाहन मालकाने शहर पोलीस ठाण्यात खासगी फिर्यादही दाखल केली आहे.

या सर्व घटनाक्रमात पो.कॉ.सलमान शेख, पो.कॉ.प्रशांत केदार व भागीरथ देशमाने स्ट्रयकींग फोर्सचे हे तिनही जवान शेवटपर्यंत खाली राहीले. त्यामुळे जसजसा जमाव वाढत गेला, तसतशी तीनबत्तीकडे पायी निघालेल्या या जवानांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ वाढत गेली. तीनबत्ती चौकात आल्यानंतर तर जमावाने त्यातील एका जवानाला चौकातच मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे मोठे जमाव जमल्याने त्या जवानाला जीव वाचवण्यासाठी पळावे लागले. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व त्याबाबतच वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात जनक्षोभ निर्माण झाला. आपले घरदार सोडून, नागरिकांच्याच सुरक्षेसाठी धोका पत्करुन काम करणार्या जवांनावर झालेल्या हल्ल्याचे जागोजागी निषेध झाले. या प्रकरणी सरकारी कामात आडथळा आणल्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. कालपासून पोलिसांनी अटकसत्रही सुरु केले असून चार जणांना गजाआड करण्यात यश आले आहे.

गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष्य संगमनेरकडे केंद्रीत केले. एकीकडे घरदार सोडून, कुटुंब सोडून शेकडों किलोमीटर दूर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना नियम सांगण्याचा प्रकार, तर दुसरीकडे ‘आम्हाला नियम लागू नाहीत’ या अविर्भावातील समूह असे विदारक चित्र या घटनेने दाखवले. या घटनेला जबाबदार असलेला प्रत्येक घटक जोपर्यंत गजाआड होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास थांबता कामा नये. अन्यथा भविष्यातही अशा घटनांची वारंवार पुनरावृत्ती होणार हे अटळ आहे. हा प्रकार काही मुठभर लोकांनीच घडवला आहे, त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाकडे त्या दृष्टीने बघणं साफ चुकीचं ठरेल हे आम्ही आत्तापर्यंतच्या आमच्या वार्तांकनातून सांगू शकतो.

