शेतकर्‍यांना न्याय द्या; अन्यथा समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडू ः टेके कोपरगाव तालुक्यातील भोजेडे व वारीच्या शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
युती सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवे कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावातून जातो. सध्या याभागात रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. परंतु या टप्प्यातील ठेकेदारांनी, समृद्धी व्यवस्थापनाने शासनाचे दिलेले सर्व नियम जणू ढाब्यावर ठेवले की काय अशी चर्चा गावकर्‍यांमध्ये सुरू आहे. या बेशिस्त व्यवस्थापनाच्या विरोधात व शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी भोजडे व वारी गावातील शेतकर्‍यांनी समृद्धीच्या सर्व गाड्या अडवून गुरुवारी (ता.21) रास्ता रोको आंदोलन केले.


याप्रसंगी शेतकर्‍यांच्यावतीने भावना व्यक्त करताना माजी सभापती मच्छिंद्र टेके म्हणाले, नागपूर ते मुंबई पर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा महामार्ग आहेत. यासाठी हजारो एकर शेतजमिनीचे संपादन झाले. महामार्गाचे कामकाज सुरू असताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाला समृद्धी चालकांनी केराची टोपली दाखवली. या मार्गासाठी वापरण्यात आलेल्या गाड्यांना राज्य परिवहन (आरटीओ)ची परवानगी नाही, अनेक गाड्यांना नंबर प्लेट नाही किंवा दिशादर्शक चिन्ह देखील नाहीत. सर्व गाड्या अतिशय खराब अवस्थेत असलेल्या स्थितीत वापरल्या जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील अरुंद व खड्डे असलेल्या रस्त्यांचा विचार न करता इतर वाहन चालकांना, शेतकर्‍यांना जाणूनबुजून नाहक त्रास होईल अशा बेशिस्त पद्धतीने वाहनचालक गाड्या चालवतात. यामुळे रोज वेगवेगळ्या पद्धतीने अपघात होत आहे. शासन व समृद्धी शेतकर्‍यांचा बळी जाण्याचा वाट आहेत पाहत आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

सामान्य नागरिकांच्या वाहनांना नंबर प्लेट, आवश्यक ते कागदपत्रे नसेल तर पोलीस प्रशासन आणि आरटीओ अव्वाच्या सव्वा नियमबाह्य दंड वसुली करतात. मग समृद्धीच्या कामात यांना वेगळा कायदा आहे का? असा सवाल उपस्थित करुन टेके पुढे म्हणाले, या वाहतुकीमुळे संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य झाल्याने हरभरा, गहू, ज्वारी इतर पिकांबरोबर शेतकर्‍यांच्या घराघरात धूळच धूळ झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. याचबरोबर त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. प्रशासनापुढे शेतकरी कितीही ओरडून न्यायासाठी लढला तर त्याला न्याय मिळणार नसेल तर त्या शेतकर्‍यांनी न्याय मागायचा कोणाकडे? या चाललेल्या कामामुळे शेतकर्‍यांचे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. समृद्धीच्या कामासाठी माती पाहिजे असेल तर ओढ्यानाल्यांमधील माती घ्या. यामुळे जलसंवर्धनाचे काम होईल, पाण्याचा साठा वाढेल आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. याबाबत अनेकवेळा मागण्या करुन देखील प्रश्न मार्गी न लागता प्रलंबित ठेवले जातात.

सुपीक जमिनी शेतकर्‍याला मातीमोल पैसे देऊन खरेदी करुन त्या जमिनीचा विनाष करुन टाकल्यामुळे शेतकर्‍यांना पैसे घेऊन आत्महत्या करण्याची वेळ समृद्धी चालकांनी आणली आहे. हा चाललेला गोंधळ त्वरीत थांबवा अन्यथा समृद्धीच्या विरोधात मोठे जनअंदोलन उभरण्यात येईल. यातून जर काही कायदा व सुव्यवसस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्यास सर्वस्वी प्रशासन व समृद्धी व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा माजी सभापती मच्छिंद्र टेके, फकीर टेके, प्रकाश गोर्डे, गोरख लांडगे, विशाल गोर्डे, ज्ञानेश्वर वेताळ, अनिल गोरे, दत्तू ठोंबरे, नानासाहेब टेके, श्रीनिवास टेके, सुधाकर ठोंबरे, अजय मेहरे, पोपट शिरसाट आदी शेतकर्‍यांनी दिला आहे.

तहसीलदारांची भूमिका ठरली महत्त्वपूर्ण…
शेतकरी व समृद्धी व्यवस्थापन यांच्या वादातून झालेले रास्ता रोको आंदोलन तब्बल पाच तास सुरू होते. सदर प्रकरणाची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांना मिळताच त्यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करुन प्रलंबित प्रश्न व समस्या समजून घेतल्यांनतर शेतकर्‍यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *