नेवाशातील शासकीय रुग्णालयांना अत्यावश्यक सुविधा पुरवा ः मुरकुटे

नेवाशातील शासकीय रुग्णालयांना अत्यावश्यक सुविधा पुरवा ः मुरकुटे
तहसीलदारांना निवेदन; 500 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्याचीही केली मागणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील ‘कोविड-19’ रुग्णांच्या शासकीय रुग्णालयामध्ये स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासकीय रुग्णालयांना देखील अत्यावश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


सदर निवेदनात मुरकुटे यांनी म्हटले आहे की, नेवासा तालुक्यात एकच शासकीय कोविड रुग्णालय उपलब्ध आहे. तालुक्यात दिवसेंदिवस कोविड-19चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शासकीय रुग्णालयात रुग्णांना आवश्यक ते उपचार मिळत नाही, अनेक रुग्णांना बेडअभावी खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. शनिशिंगणापूर येथे सुरू असलेल्या कोविड रुग्णालयामध्ये अत्यंत अस्वच्छता असल्यामुळे रुग्णांना कोविड बरोबर इतरही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दरम्यान, शासकीय रुग्णालयात बेड मिळत नसल्या कारणाने रुग्णांना अहमदनगर, पुणे, मुंबई, औरंगाबाद ठिकाणी उपचार घ्यावे लागत आहे. अपुर्‍या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नेवासाफाटा येथे 500 बेडचे शासकीय कोविड रुग्णालय उभारून त्यामध्ये कोविड तपासणी, एक्स-रे मशीन, ऑक्सिजन सुविधांसह इतर सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात, शनिशिंगणापूर येथील कोविड रुग्णालयाची स्वच्छता करून तेथील बेडची संख्या वाढवावी जेणेकरून तालुक्यातील गोरगरीब जनतेची हेळसांड होणार नाही आणि त्यांना वेळवर उपचार मिळतील. अशा विविध मागण्या आणि सूचना निवेदनातून केलेल्या आहेत. वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती उपाययोजना करावी असेही निवेदनात माजी आमदार मुरकुटे यांनी नमूद केले आहे. सदरचे निवेदन निवासी नायब तहसीलदारांनी स्वीकारले. यावेळी रामभाऊ खंडाळे, नगरसेवक सुनील वाघ, एकनाथ भगत, मनोज पारखे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *