नाशिक पाठोपाठ आता संगमनेरातही ‘बिबट्या’ घरात! मेडिकव्हरपासून मालदाड रोडपर्यंत संचार; भूल देवून पकडण्याचे प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मेडिकव्हर हॉस्पिटलच्या परिसरात दिसणारा बिबट्या चक्क गणेशनगरमधून महामार्ग ओलांडीत मालदाड रोडपर्यंत पोहोचला आहे. सुरुवातीला काहीकाळ त्याने नाशिकरोडवरील मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतला होता, मात्र त्यानंतर तो पाठीमागील बाजूने थेट मालदाड रोडवरील आदर्श कॉलनीत पोहोचला असून तेथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जावून फसला होता. त्यामुळे वनविभागाने त्याला भूलीचे इंजेक्शन मारले असून त्याला पिंजर्यात कैद करुन नेण्याची तयार सुरु आहे. आज सकाळपासून शहरात बिबट्या शिरल्याच्या चर्चा सुरु झाल्याने प्रत्यक्ष त्याचे दर्शन घेण्यासाठी मालदाडरोड परिसरात प्रचंड गर्दी उसळली आहे.
शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आज (ता.22) सकाळी साडेसहाच्या सुमारास गणेशनगरमधून येत एका बिबट्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग ओलांडला. त्यानंतर त्याने शेतकी पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूने मालपाणी लॉन्सची संरक्षक भिंत ओलांडून आंत प्रवेश केला. मात्र त्याची ही संपूर्ण हालचाल एका पोलीस कर्मचार्याने पाहिल्याने त्याने लागलीच मालपाणी उद्योग समूहाला याबाबतची माहिती दिली. त्यामुळे सावध झालेल्या कर्मचार्यांनी लॉन्सच्या आतील बाजूस गदारोळ केल्याने भांबावलेला बिबट्या तेथून पाठीमागील बाजूने पद्मनगर परिसरातून मालदाड रोडकडे गेला.
सकाळच्यावेळी या रस्त्यावरही बर्यापैकी वाहतूक आणि नागरीकांची वर्दळ असल्याने गोंधळलेला बिबट्या मालदाडरोडने धावत आदर्श वसाहतीत शिरला आणि तेथील जाधव यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये अडकला. याबाबतची माहिती मिळताच वनविभागासह शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून ‘त्या’ बिबट्याला भूलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात यश आले आहे. काही वेळातच त्याला वनविभागाच्या पिंजर्यातून त्याच्या मूळ अधिवासात सोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. शहरात आणि त्यातही एकाच्या घरात बिबट्यात शिरल्याची अफवा सध्या शहरभर पसरल्याने अनेकजण मालदाडरोडकडे धाव घेत आहेत.