साईभक्तांना पूर्वीप्रमाणे श्री साईसत्यव्रत पूजा करता येणार श्री साईसच्चरित ग्रंथ वाचनासाठी पारायण कक्षही होणार सुरू

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्यावतीने 1 एप्रिलपासून साईभक्तांना पूर्वीप्रमाणे श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा व 2 एप्रिल, 2022 पासून श्री साईसच्चरित हा पवित्र ग्रंथ वाचनासाठी पारायण कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

श्री साईसच्चरितामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे साईभक्त श्री साईसत्यव्रत पूजा व अभिषेक पूजा करण्याकरिता आग्रही असतात. त्याकरिता संस्थानने शनि मंदिराच्या मागील भागामध्ये श्री साईसत्यव्रत कक्ष उभारलेले आहे. तसेच समाधी मंदिराच्या समोरील भागामध्ये भक्तांकरिता श्रींची अभिषेक पूजा आयोजित करण्यात येते. या दोन्ही पूजांमध्ये सहभागी होण्याकरीता साईभक्तांना ऑनलाईन किंवा देणगी कार्यालयामध्ये बुकींग करून पूजेमध्ये सहभागी होता येते. साईसत्यव्रत पूजेकरिता 100 रुपये देणगी शुल्क आकारले जात असून दररोज सकाळी 7 ते 8, सकाळी 9 ते 10 व सकाळी 11 ते 12 या 03 बॅचमध्ये मंदिर पुजारी यांच्या मार्फत पूजा करुन प्रसाद म्हणून एक श्रीफळ व शिरा प्रसाद दिला जातो. तसेच अभिषेक पूजेकरिता 101 रुपये देणगी शुल्क आकारले जाते. दररोज सकाळी 7 ते 8 व सकाळी 9 ते 10 या 02 सत्रामध्ये मंदिर पुजारी यांच्या मार्फत पूजा करून प्रसाद म्हणून एक श्रीफळ व 1 लाडू पाकिट दिले जाते.

तसेच श्रीसाईसच्चरित हा ग्रंथ श्री साईबाबांच्या संबंधीच्या वाङमयात सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून साईभक्तांना परिचित आहे. हा ग्रंथ (स्व.) गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंत यांनी श्री साईबाबांच्या कृपाप्रसादाने लिहिलेला असून साईभक्त या ग्रंथाला बाबांची वाङमयमूर्ती मानतात. श्री साईबाबा संस्थानने मराठी भाषेव्यतिरिक्त 16 भाषांमध्ये हा ग्रंथ भाषांतरीत केला आहे. श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक श्री साईबाबांच्या अद्भूत लीला व उपदेश जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. याकरिता संस्थानच्यावतीने मंदिर परिसरात श्री साईसच्चरित या ग्रंथाचे भाविकांना एकांतात वाचन करता यावे, म्हणून संस्थानमार्फत लेडींबागेतील श्रीदत्त मंदिराचे मागील बाजूस स्वतंत्र पारायण कक्ष उभारण्यात आलेला आहे.

परंतु गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे 17 मार्च, 2020 रोजी श्रींचे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा श्री साईबाबांची समाधी, द्वारकामाई, गुरुस्थान, ग्रामदैवत गणपती, शनिदेव, महादेव, लेंडीबागेतील श्रीदत्त व नंदादीपाचे दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात येऊन एकाच रांगेतून भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र यावेळी श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा व पारायण कक्ष भाविकांसाठी खुले करण्यात आलेले नव्हते. आता करोना विषाणूचे प्रमाण घटल्याने राज्य शासनाच्यावतीने करोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे भाविकांकरिता संस्थानच्यावतीने एकामागून एक सुविधा खुल्या करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने संस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा व पारायण कक्ष पूर्वीप्रमाणे सुरू करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा व पारायण कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थान व्यवस्थापन मंडाळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे व मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आणि विश्वस्त मंडळ सदस्यांनी केले आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 147755

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *