साकुरीमध्ये महिला दिनीच पतीने केला पत्नीचा खून पतीचाही विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न; राहाता पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, राहाता
काही महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या 19 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात चाकू खूपसून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने विष प्राशन केले असून त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. एकीकडे जागतिक महिला दिन धूमधडाक्यात साजरा केला जात असताना ही खळबळजनक घटना साकुरी (ता.राहाता) गावात घडली.
याप्रकरणी मयत मुलीचे वडील सुखदेव बाळासाहेब नागरे (वय 45, रा.साकुरी (डांगे वस्ती) यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, माझी मुलगी सविता व पिंपळस येथील मुलगा सनी उर्फ सुनील शिवाजी ससाणे यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे मी त्यांचा आंतरजातीय विवाह वर्षांपूर्वी लावून दिला होता. मुलगी व जावई दोघेही साकुरी शिवारातच बरबंट यांच्या वस्तीवर मोलमजुरी करून त्यांची उपजीविका भागवत होते. परंतु लग्नानंतर तीन महिन्यांतच मुलगी सविता हिला तिचा पती सुनील संशयावरून सारखा मारहाण करत असे. नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलते असे म्हणत संशय व्यक्त करून नेहमीच मारहाण, दमदाटी करायचा. ही बाब मुलीने मला सांगितली. त्यानंतर जावई सनी उर्फ सुनील ससाणे यास मुलीवर संशय घेऊ नकोस तिला मारहाण करून दमदाटी करू नकोस, असे वारंवार सांगितले. मात्र त्याच्या वर्तनात कुठलाही बदल झाला नाही.
दरम्यान, जागतिक महिला दिनी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरातील आम्ही सर्व शेजारी लग्नाची वरात असल्याने पाहण्यासाठी गेले होतो. तेथे मुलगी सविता व तिचा पती सुनील हे देखील आले होते. लग्नाची वरात संपल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास आम्ही सर्व तिथून आमच्या घरी गेलो. मुलगी व जावई हे त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर 9 मार्चला सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलगी सविता व तिचा पती सुनील खूप वेळ झाला तरी घराच्या बाहेर दिसले नाही म्हणून त्यांच्या कोपीकडे त्यांना बघण्यासाठी दुसर्या मुलीला पाठवले असता तेथे मुलगी सविता जमिनीवर पडलेली दिसली.
तिच्या पोटावर रक्त साकळलेले व तिच्या उजव्या हाताजवळ छोटासा चाकू दिसून आला. सविता तेथे मृतावस्थेत तर जावयाच्या हातात चाकू दिसला व ते मला पाहून कोपी बाहेर पळाले, असे दुसरी मुलगी सरला हिने सांगितले. त्यामुळे तिने तेथे घाबरून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा आम्ही तत्काळ तेथे पळत गेलो. तेथे बघितले असता सविता मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती बघितली असता कोपीपासून काही अंतरावर आरोपी पती बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल केले. त्याने विषारी औषध घेतले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. आंतरजातीय विवाह केल्यानंतर वर्षे उलटले नाही तोच तीन महिन्यांतच चारित्र्यावर संशय घेऊन पतीने 19 वर्षीय पत्नीच्या पोटात चाकू खूपसून खून केल्याच्या घटनेने साकुरीसह राहाता परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करीत आहेत.