राहुरीमध्ये मुद्रांकांचा तुटवडा; ‘छावा’ व निबंधकांत खडाजंगी
राहुरीमध्ये मुद्रांकांचा तुटवडा; ‘छावा’ व निबंधकांत खडाजंगी
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरात शंभर रुपये किंमतीच्या मुद्रांकाचा बर्याच दिवसांपासून तुटवडा आहे. याबाबत मंगळवारी (ता.13) दुय्यम निबंधक दीपक रोहकले यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकार्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे त्यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी उडाली. मुद्रांक वितरणाचा गोंधळ सोडविला नाही, तर दुय्यम निबंधक कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा छावा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे, तालुकाध्यक्ष रमेश म्हसे, अमोल वाळुंज, अॅड.प्रवीण हरिश्चंद्रे, मनोज औटी, शुभम कोल्हापुरे, दत्ता अडसुरे, हसन सय्यद आदी उपस्थित होते. दुय्यम निबंधक रोहकले यांच्याकडे मुद्रांक तुटवडा व वितरणातील गोंधळाची समस्या मांडली. मात्र, दुय्यम निबंधक रोहकले यांनी ‘या विषयाशी माझा संबंध नाही, तुम्ही कोषागार कार्यालयात जा’ असे उत्तर देत निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर छावाच्या पदाधिकार्यांनी उपकोषागार अधिकारी मुळे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी मुद्रांक वितरणाचे काम आमचे आहे. मुद्रांक विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम दुय्यम निबंधक कार्यालयाचे आहे, असे लेखी दिले. त्यानंतर पदाधिकार्यांनी पुन्हा दुय्यम निबंधक कार्यालय गाठले, त्यावेळी त्यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. मग निबंधकांनी निवेदन स्वीकारले. परंतु समस्या दूर न झाल्यास पूर्वकल्पना न देता आंदोलन करण्याचा इशारा पदाधिकार्यांनी दिला.