कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सीडी वर्कसह गटाराचे काम तातडीने करा! अकोले नगरपंचायत पदाधिकार्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी राज्यमार्गावर सीडी वर्क व गटाराचे काम तातडीने करावे अशी मागणी करीत ही कामे पावसाळ्यापूर्वी न केल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले यांसह नगरसेवकांनी दिला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांनी पुढील महिन्यात 1 किंवा 2 एप्रिलला पाहणी करण्यास येणार असल्याचे सांगितले.

सोमवारी (ता.28) संगमनेर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांना अकोले नगरपंचायतीच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, अकोले शहरातून जाणार्या कोल्हार-घोटी या राज्य मार्गाचे काम चालू आहे. शेकईवाडी ते अगस्ति विद्यालयापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास गेलेले आहे. मात्र हे काम चालू असताना पावसाळ्यात येणारे पावसाचे पाणी, गटाराचे पाणी वाहून जाण्यासाठी कोठेही सीडी वर्कचे व गटारीचे काम झालेले नाही. मागील पावसाळ्याचा अनुभव लक्षात घेता सीडी वर्कचे काम न झाल्यामुळे पावसाचे व गटारीचे पाणी दुकानांत शिरून मोठे नुकसान झालेले आहे.

सध्या पावसाळा दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपला असून सीडी वर्कचे व गटारीचे काम न झाल्यास पावसाचे पाणी व गटारीचे पाणी पुन्हा दुकानांत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गटारीचे पाणी साचून तेथे डासांची उत्पत्ती होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या सर्व बाबींचा रोष कारण नसताना अकोले नगरपंचायत व आरोग्य विभागावर येऊ शकतो. तरी वरील सर्व बाबींचा विचार करून सीडी वर्कचे व गटारीचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा पावसाळ्यात होणार्या नुकसानीची व आरोग्य धोक्यात येण्याची जबाबदारी आपल्यावर राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू व त्याच्या होणार्या दुष्परिणामांची जबाबदारी आपल्या विभागावर राहील असा इशारा दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, आरोग्य विभागाचे सभापती शरद नवले, सागर चौधरी, स्वीकृत नगरसेवक विजय पवार, सोमेश्वर उर्फ बबलू धुमाळ, मोसीन शेख, प्रसन्न धोंगडे आदी उपस्थित होते.
