श्रीरामपूर एमआयडीसीतील शाईचा कारखाना आगीत खाक तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज; सुदैवाने जीवितहानी टळली

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील एमआयडीसीमध्ये प्रिटींग करता लागणारी शाई बनविणार्‍या ‘सरफेस कोटिंग’ या कंपनीला सोमवारी (ता.28) सकाळी 11 वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीमध्ये कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुमारे तीन ते चार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने जीवितहानी टळली.

सदर एमआयडीसीमध्ये कृष्णा यादव यांची प्लॉट क्रमांक सी-89 मध्ये ‘सरफेस कोटिंग’ नावाने प्रिटींगसाठी लागणारी शाई बनविली जात होती. सकाळी 11 वाजेच्या सुमारास रोजच्याप्रमाणे काम सुरू असताना अचानकपणे आग लागली. यावेळी यादव व कंपनीतील तीन ते चार कर्मचार्‍यांनी आग विरोधक नळकांडेही फोडले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने त्यांनी बाहेरच्या दिशेने पळ काढला. यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले. मोठमोठे स्फोट होत होते. आग विझविण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिका, अशोक कारखाना, गणेश कारखाना, देवळाली प्रवरा नगरपालिकेचे अग्निशामक बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले होते. तसेच साई संस्थानचा फोम बंबही घटनास्थळी दाखल झाला. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलीस निरीक्षक संजय सानप, तहसीलदार प्रशांत पाटील, आमदार लहू कानडे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, एमआयडीसीतील उद्योजक बाबासाहेब काळे यांच्यासह अन्य उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तातडीने परिसरातील वीज बंद केली. सदर उद्योजकाने कंपनीचा कोणताही विमा उतरविलेला नसल्याचे समजते. तसेच आगीचे नेमके कारण समजले नसून संबंधित अधिकार्‍यांकडून तपासणीनंतरच याबाबत माहिती मिळेल.

Visits: 103 Today: 1 Total: 1105003

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *