इन्स्टाग्रामच्या मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार! मुलाकडून विकृत कृत्य; पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीची तुरुंगात रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अलिकडच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करीत आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना नियमीत झाल्या आहेत. मात्र आता अशा माध्यमांचा वापर करीत महिला व मुलींना आपल्या प्रेमपाशात ओढून त्यांच्यावर शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होवू लागली आहे. संगमनेर तालुक्यातही यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या असतांना आता नव्याने समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. या प्रकरणात सोशल माध्यमातील ‘इन्स्टाग्राम’ या प्लॅटफॉर्मचा वापर करीत आश्वीतील तरुणाने संगमनेरातील एका अल्पवयीन मुलीवर वर्षभर शारीरिक अत्याचार केले. या कालावधीत त्याने पीडितेला आपले प्रेम खरेच असल्याचे सिद्ध करण्यासाठी शरीरावर ब्लेडचे वारही करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडितेने रविवारी रात्री उशिराने दाखल केलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अत्याचारासह पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी लखन अशोक राजपूत याला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या वर्षी जुलै ते चालू वर्षी जानेवारी दरम्यान संगमनेर व कोपरगाव येथील वेगवेगळ्या लॉज व आश्वीतील आरोपीच्या घरात घडला आहे. आश्वीतील लखन अशोक राजपूत या तरुणाने समाज माध्यमातील ‘इन्स्टाग्राम’ या प्लॅटफॉर्मचा वापर करीत संगमनेर शहरालगतच्या उपनगरात राहणार्‍या साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. सदरील मुलगी आपल्या जाळ्यात अडकत असल्याचा विश्वास पटताच त्याने आपण राष्ट्रीयकृत बँकेत सेवेत असल्याचे भासवून तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्याच्या या प्रस्तावाला भुलून सदरील अल्पवयीन मुलगी त्याच्या आमिषाला बळी पडली. त्याचा गैरफायदा घेत आरोपीने सुरुवातीला संगमनेर व नंतर कोपरगाव येथील लॉजवर नेवून तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध शारीरिक अत्याचार केले. जसे जसे दिवस जावू लागले तसे तसे त्याच्या हव्यासात वाढ होत गेल्याने नंतरच्या काळात तो तिला स्वतःच्या आश्वीतील घरीही घेवून जावू लागला व तेथे नेवूनही त्याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या दरम्यान त्याच्यातील विकृतीही जागी झाली आणि त्याने ‘माझा तुझ्यावर विश्वास नाही, मी जे सांगेल ते तू केलेस तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवील’ असे सांगत तिच्यावर मनमानी करण्यास सुरुवात केली.

सदरील अल्पवयीन मुलगी पूर्णतः त्याच्या जाळ्यात अडकलेली असल्याने या कालावधीत तो जे सांगत होता, ते ती मुलगी करीत होती. त्यामुळे त्या आरोपीची विकृतीही अधिक प्रकर्षाने समोर येवू लागली. त्यातूनच आपले प्रेम खरे असल्याचे दाखवण्यासाठी त्याने ‘त्या’ अल्पवयीन मुलीला ब्लेड पानच्या साहाय्याने स्वतःच स्वतःच्या मनगटावर, मांडीवर व छातीवर वार करण्यास भाग पाडले. यातून आपल्या विकृतीचे बिंग फुटू नये म्हणून तो वारंवार तिला पळून जावून लग्न करण्याचेही आमिष दाखवित होता. या दरम्यान त्याने ‘तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर मी तुझे फोटो व्हायरल करील व तुझ्या भावाचेही अपहरण करील’ अशी धमकीही दिली. त्यामुळे घाबरलेल्या त्या मुलीने सदरचा प्रकार आपल्या घरी सांगितला.

गेल्या वर्षी जुलैपासून ते चालू वर्षी जानेवारीपर्यंत आपल्या लहानशा मुलीसोबत सुरु असलेला विकृतीचा हा प्रकार ऐकून तिच्या जन्मदात्यांना जबर धक्का बसला. त्यातून स्वतःला सावरीत रविवारी (ता.27) रात्री उशिराने त्यांनी आपल्या मुलीसह शहर पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या कानावर घातला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही तत्काळ या प्रकरणी तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन आश्वीतील लखन अशोक राजपूत या विकृताविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (एन), 504, 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करीत रविवारी रात्रीच आश्वीतून त्याच्या मुस्कया आवळीत त्याला तुरुंगात डांबले आहे.

कोविड संक्रमणाच्या कारणाने मागील दोन वर्ष शाळा-महाविद्यालये बंद होती. या कालावधीत अगदी इयत्ता पहिलीपासून ते महाविद्यालयापर्यंतच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. कोविड संक्रमणाच्या पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी कधी मोबाईल वापरले नव्हते अशा विद्यार्थ्यांनाही कोविडने ते वापरण्यास भाग पाडले. अनेक पालकांना आपल्या पाल्यांना या वयात मोबाईल देण्याची इच्छा नसते, मात्र कोविडमुळे त्यांनाही आपल्या धारणा बदलाव्या लागल्या. त्यातून घडलेले चांगले-वाईट परिणाम आता समोर येवू लागले आहेत. ऑनलाईन अभ्यास करताकरता अनेक विद्यार्थी डिजिटल क्रांतीच्या जाळ्याकडे आकर्षित झाल्याने त्यातून अशाप्रकारच्या अनेक घटना देशभरातून समोर येत आहेत, त्यात आता संगमनेरसारख्या ग्रामीणभागातील प्रकारही समोर आल्याने पालकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.


सध्याच्या काळात संपूर्ण विश्व स्थित्यंतरातून जात असून डिजिटल क्रांतीने मानवासाठी अवघं जग ठेंगणं बनलं आहे. एकीकडे या क्रांतीचा वापर करुन मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडत असताना, दुसरीकडे त्याच्या गैरवापरातून मानवाच्या जीवनात वेदनाही निर्माण होत आहेत. अशा प्रकारच्या डिजिटल माध्यमातून आर्थिक लुटीच्या घटनांसोबतच आता अल्पवयीन मुलींना फसवण्याचेही प्रकार वारंवार समोर येवू लागले असून पालकांनी अधिक सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. संगमनेरातून समोर आलेला हा प्रकारही असेच सांगणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *