भविष्यात सातत्याने कौशल्य निर्मितीवर भर द्यावा लागेल ः डॉ. कुलकर्णी संगमनेर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भविष्यकाळात ज्ञान टिकविण्याची खरी समस्या समाजामध्ये निर्माण होणार आहे. शिक्षणातून कौशल्ये निर्मितीसाठीचा ध्यास आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वर्तमान काळाचेही सतत स्मरण ठेवावे. येणार्या काळात सातत्याने कौशल्य निर्मितीवर भर दिला पाहिजे. तरच आपण शिक्षण व रोजगार यांचा योग्य समन्वय साधू शकणार आहोत, असे मत पुणे येथील एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अनिल कुलकर्णी यांनी केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता सुधार योजना सेल यांच्या विद्यमाने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि समस्या’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. डॉ. प्रशांत साठे (बीएमसीसी महाविद्यालय पुणे, शिक्षण प्रसारक संस्थेचे व्यवस्थापकीय सदस्य जसपाल डंग, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र तशिलदार, उपप्राचार्य प्रा. ढमक, डॉ. दिगंबर घोडके, प्रा. प्रवीण त्र्यंबके, प्रा. श्रीहरी पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. कुलकर्णी म्हणाले, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना, ‘राखावी बहुतांशी अंतरे’ या संत वचनाप्रमाणे भावी काळात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच प्रादेशिक भाषांना महत्त्व येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे निश्चितच रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. म्हणूनच काळानुसार शिक्षणामध्ये आपण बदल स्वीकारला पाहिजे. भविष्यकाळात शिक्षण पद्धतीमध्ये योग्य बदल घडविला नाही तर, खर्या अर्थाने देशासमोर अनेक समस्या निर्माण होतील. आज देशात अनेक तरुणांना पदवी असूनही बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रोजगारक्षम नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची ही चांगली संधी आहे. तसे पाहता पूर्वीपासूनच भारताला आदर्श शिक्षणाची संस्कृती लाभली आहे. जगात अतिउच्च पातळीवरचे शिक्षण देणारे केंद्र म्हणून भारताने पुढे आले पाहिजे, असे नमूद केले.

दुसर्या सत्रात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. प्रशांत साठे म्हणाले, भावी काळात प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थी व शिक्षक यांचे एक आदर्श नाते निर्माण झाले पाहिजे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन झाले तर त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास अडचणी येणार नाहीत. शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच आपल्या महाविद्यालयात विविध कौशल्ये कसे निर्माण करता येतील हे पाहणे आवश्यक आहे. भावी काळाची ओळख आपल्या विद्यार्थ्याला करून देता आली पाहिजे असेही ते म्हणाले. संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रा. प्रवीण त्र्यंबके मानले.
