सचेतन अवस्थेत चिमुरड्याच्या मेंदूवर केली शस्त्रक्रिया साई संस्थानच्या डॉक्टरांची किमया; चिमुरड्यासह डॉक्टरांचे होतेय कौतुक
नायक वृत्तसेवा, शिर्डी
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मेंदूवरील शस्त्रक्रिया आता अवघड राहिल्या नाहीत. मात्र, साध्या इंजेक्शनच्या सुईलाही घाबरण्याचे वय असलेल्या चिमुरड्यावर भूल न देता सचेतन अवस्थेत लिंबाएवढी गाठ काढून टाकण्याची शस्त्रक्रिया शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात डॉक्टरांनी यशस्वी करून दाखविली आहे. यामध्ये त्या चिमुरड्याचे धाडस आणि डॉक्टरांच्या कौशल्याचे कौतुक होत आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी व भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सूरवसे यांच्या पथकाने नऊ वर्षाच्या मुलावर ही शस्त्रक्रिया केली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गणेश गोरख पवार याला त्याचे पालक शिर्डीच्या रुग्णालयात घेऊन आले होते. त्याला फिट येत असल्याची तक्रार होती. डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलाच्या उजव्या मोठ्या मेंदूत लिंबाच्या आकाराची गाठ असल्याचे आढळून आले. ही गाठ ज्या भागात होती, तेथून डावा हात व पायाच्या नसांचे नियंत्रण होत होते. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना इजा झाल्यास अर्धांगवायू होण्याची भीती होती. त्यामुळे ही शस्त्रक्रिया रुग्णाला पूर्ण भूल न देता त्याची हालचाल सुरू ठेवत आणि बोलता बोलता करणे आवश्यक होते.
यासंबंधी पालकांना आणि रुग्णाला माहिती देण्यात आली. वेदना सहन करण्याची तयारी त्या बालकाने ठेवली. हे प्रकरण वरकरणी सोपे वाटत असले आणि डॉ. मुकुंद चौधरी यांना अशा ऑपरेशनचा अनुभव अन् प्राविण्य असले तरी खरी अडचण समोर होती, ती 9 वर्ष वय असलेले मुलं जिथे इजेक्शनला घाबरतात तिथे हा मुलगा जागे राहून ऑपरेशन करुन घेईल का? हा मोठा प्रश्न होता. तिथे वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सूरवसे यांचा प्रदीर्घ अनुभव कामी आला. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी बेशुध्द न करता भूल देण्यासाठी तयारी दर्शवली. त्यानुसार 26 डिसेंबरला मुलावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. मुलाशी बोलत, त्याला हातापायांची ताकद तपासायला लावत ही शस्त्रक्रिया कोणताही धोका न होता पार पडली. डॉ. संतोष सूरवसे यांनी फक्त डोक्याच्या त्वचेला भूल दिली. त्यानंतर रुग्णाला कुठलेही झोप येणारे इंजेक्शन दिले गेले नाही. डॉ. मुकुंद चौधरी यांनी त्यानंतर साधारणपणे दीड तासात पूर्ण गाठ काढून ऑपरेशन संपविले. ऑपरेशन दरम्यान मुलाच्या हात व पाय यांच्या ताकदीची वारंवार तपासणी करण्यात आली. रुग्ण ऑपरेशन दरम्यान जागाच असल्यामुळे व ऑपरेशन दरम्यान शून्य वेदना झाल्यामुळे ही तपासणी करणे शक्य झाले. ही आगळी वेगळी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉ. शैलेश ओक व उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी पथकाचे अभिनंदन केले.
ही अवघड आणि महागडी शस्त्रक्रिया साईबाबा रुग्णालयात मोफत झाली. येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून निशुल्क उपचार करता येतात. त्याचा फायदा मुलाच्या पालकांना देण्यात आला. मुलाच्या मेंदूतील गाठ पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून भूलतज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या कौशल्यामुळे वेदनाही झाल्या नाहीत. शस्त्रक्रियेची संपूर्ण प्रक्रिया त्याने जागेपणी अनुभवली.