संगमनेरचा नाशिकरोड ठरतोय गुन्हेगारांसाठी सोयीचा! भरदुपारी घराचा दरवाजा तोडला तर, सायंकाळी धूमस्टाईल चोरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
थांबले थांबले म्हणता संगमनेरातील चोर्‍यांचे सत्र पुन्हा एकदा जोमात सुरु झाले असून चोरट्यांनी नाशिककडे जाणारा रस्ता लक्ष्य केल्याचे मागील काही घटनांवरुन दिसत आहे. या साखळीत रविवारी आणखी दोन घटना समोर आल्या असून पहिल्या घटनेत तर भरदुपारी घराचा दरवाजा तोडून दोघांनी तब्बल सव्वाचार लाखांचा ऐवज लांबविला, तर दुसर्‍या घटनेत आपल्या मोपेडवरुन घराकडे जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडण्याचा प्रकार समोर आला. एकाच दिवशी घडलेल्या या दोन्ही घटनांनी शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील पहिली घटना रविवारी (ता.19) भरदुपारी 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील स्वदेश हॉटेलच्या पाठीमागील वसाहतीत घडली. आरोग्य विभागात कार्यरत असलेले अनित दिनकर काळे हे दुपारी बाराच्या सुमारास आपल्या घराच्या मुख्य दरवाजासह प्रवेशद्वारालाही कुलुप लावून काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या परिचयातील दोघांनी या संधीचा फायदा घेतला. दुपारची वेळ असल्याने आसपास कोणी नसल्याचे पाहून या दोघा चोरट्यांनी त्यांच्या घराच्या प्रवेशद्वाराचे व नंतर घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून आंत प्रवेश केला.

यावेळी चोरट्यांनी आधीच माहिती असल्याप्रमाणे घरात प्रवेश करताच थेट कपाट गाठून त्यात ठेवलेल्या 1 लाख 50 हजार रुपयांच्या रोकडसह 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, झुमके, चेन, अंगठी व लटकण असे सोन्याचे नऊ तोळ्यांचे दागिने व 54 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण असा एकूण 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून तेथून पोबारा केला. अनित काळे हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कामकाज आटोपून घरी परतले तेव्हा त्यांना प्रवेशद्वारासह घराचा दरवाजा उघडा दिसला. आंत जावून त्यांनी पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यावेळी त्यांनी सीसीटीव्ही तपासला असता त्यात घरात प्रवेश करणारे दोघेही परिचित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरुन त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून आरोपी सचिन काशिनाथ रोकडे (रा.बालाजीनगर) व अशोक बढे (पूर्ण नाव माहिती नाही, रा.तळेगाव दिघे) या दोघांविरोधात घराचा दरवाजा तोडून 4 लाख 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी या दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांच्याकडे सोपविला आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असली तरीही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

भरदुपारी घडलेल्या या घटनेतून निर्माण झालेली चोरट्यांची दहशत कमी होत नाही तोच सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास श्री.ओंकारनाथ मालपाणी विधी महाविद्यालयाजवळ दुसरी एक घटना घडली. संगमनेर महाविद्यालयाच्या मागील बाजूस राहणार्‍या बबीता संजय आसावा या आपल्या मोपेडवरुन घराकडे जात असतांना पाठीमागून मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले. मात्र सदर महिलेने प्रसंगावधान राखून एका हाताने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र पकडून ठेवले. त्यामुळे त्याचा अर्धाभाग तुटल्याने चोरट्यांनी तेवढाच भाग घेवून तेथून धूम ठोकली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत नाशिक रस्त्यावरील 133 के.व्ही. उपकेंद्र ते घुलेवाडी फाट्यापर्यंतच्या परिसरात चोरीच्या साखळी घटना घडल्या आहेत. शहराच्या अन्य भागात अभावाने समोर येणार्‍या अशा घटना या परिसरात मात्र सातत्याने समोर येवू लागल्याने चोरट्यांना हा परिसर सोयीचा ठरतोय की काय अशी शंका निर्माण होवू लागली आहे. यातील पहिल्या घटनेत तर चोरट्यांनी भरदुपारी प्रवेशद्वार व घराच्या दरवाजाचे कुलुप तोडून ऐवज लांबविल्याने या परिसरातील नागरिकांच्या मनात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.


गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखा व संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी वडाळा महादेव (ता.श्रीरामपूर) येथील सोनसाखळी चोरांची टोळी उघड केली होती. त्यानंतर काही दिवसांतच उपविभागीय अधिकार्‍यांच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील दोघांना अशाच प्रकरणात अटक केली. त्यानंतर संगमनेरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला असे वाटत असतांना रविवारी सायंकाळी पुन्हा एकदा महिलांना लक्ष्य करण्याचा प्रकार घडल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

Visits: 41 Today: 2 Total: 115060

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *