आश्चर्यम्; सावरगाव तळमध्ये सापडले सात किलोचे ‘रताळे’! चार महिन्यांपासून पाणी नसतानाही घडला निसर्गाचा चमत्कार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगाव तळ हे पूर्वी रताळाचे सावरगाव म्हणून प्रसिद्ध होते. तेथे नुकतेच सात किलो वजनाचे रताळू सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जमीन मुरमाड हलक्या प्रतीची तर आहेच शिवाय चार महिन्यांपासून या रताळीच्या वेलीला पाणी दिलेले नसतानाही निसर्गाचा चमत्कार येथील हिराबाई नेहे यांच्या शेतात झाला आहे.
शेतकरी हिराबाई नेहे यांनी मागील वर्षी खरीपात कांदा पीक लावले होते. त्या पिकाच्या कडेला त्यांनी जमिनीपासून एक फूट उंचीवर बांधाला जो की पूर्ण मुरमाड आहे तेथे रताळीचा वेल लावला होता. तेथे आता तीन-चार महिन्यांपासून कोणतेही पीक नाही. त्यामुळे पाणी देण्याचा प्रश्नच नसताना त्या एकाच रताळीच्या वेलाला जमिनीत एकच सात किलो वजनाचे रताळी कंद आले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे खत, औषध किंवा चार महिन्यांपासून पाणी सुद्धा नसताना मिळाले. याला काळ्या आईचा चमत्कारच समजत आहे.
शेतकरी हिराबाई नेहे ‘काकू’ या नावाने प्रसिद्ध असणार्या प्रती राहीबाई पोपेरेच आहेत. एकही मूळाक्षर गिरविलेले नाही, अर्थात शाळेची पायरीच कधी चढल्या नाहीत. कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी त्यांचे वेगळेच तत्वज्ञान आहे. त्यांच्या हातचा चुलीवरचा स्वयंपाक आजही अप्रतिम नव्हे तर स्वादिष्ट असतो. घरी लागणारा भाजीपाला, डाळी असेल त्याचे अनेक देशी वाण सासरी आल्यापासून म्हणजेच पन्नास वर्षांपासून जतन करत आल्या आहेत. यात देशी गावरान डांगर, भोपळा, कारले, दोडका, घोसाळे, भेंडी, वांगे, मेथी, शापू, करडई, आंबाडी, तांदुळसा, चंदनबट्टा पालक, आंबेचिक्कू, धने, मोहरी, तूर, उडीद, मूग, चवळी, काळा वाल, पांढरा वाल, घेवडा, पापडा, कुहिरी वाल यांसारख्या पन्नास प्रकारच्या वाणांचा यात समावेश आहे. विशेषतः ह्या सर्व वाणांची लागवड ती शेतातील बांधाच्या कडेलाच करतात. हा सर्व विषमुक्त सेंद्रीय भाजीपाला त्यांच्यामुळे नेहे कुटुंबाला मिळत आहे.
या बियाणांचे वाण संवर्धित करण्याचे त्यांचे एक वेगळेच तंत्र आहे. वेगवेगळ्या खापराच्या मडक्यांत राख टाकून हे बियाणे जतन करून ठेवतात. त्यामुळे हे सर्व बियाणे 3 ते 4 वर्ष जरी राहिले तरीही ते खराब होत नाही. विशेष म्हणजे इतर कुटुंबानाही अनेक वर्षांपासून गरजेनुसार त्या बियाणांचे मोफत वाटप करत आहे. तसेचपारंपरिक ओव्या, गिते, जात्यावरील गाणी तयार करण्याचा आणि म्हणण्याचा त्यांचा छंदही त्यांची वेगळी ओळख करुन देतो. अशा या प्रती बीजमाता राहीबाई पोपेरे असलेल्या हिराबाई नेहे यांची अनेक महिलांना प्रेरणा मिळणार आहे.