समाज शिक्षक पत्रकारांच्या आठवणी जतन करण्यासाठी ग्रंथालय व्हावे : कांबळे प्रा. डी. के. वैद्य व रत्नप्रभा मंडलिक यांच्या निधनाबद्दल अभिवादन सभा
नायक वृत्तसेेवा, अकोले
माणूस व्यवस्थेला घडवतो व व्यवस्था माणसाला घडवते, तेव्हा त्यांचे कर्तृत्व विसरता कामा नये. चांगली माणसं विस्मरणात जाणार नाही याची समाजाने काळजी घेतली पाहिजे. माणसांच्या वेदना जाणणारी येथील पत्रकारिता असल्यानेच पत्रकाराच्या अभिवादन सभेला इतकी मोठी गर्दी दिसते. वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी तालुक्यातील पत्रकारांनी लेखणीतून लढा दिला अशा आयुष्यभर समाजशिक्षक म्हणून काम करणार्या जेष्ठ पत्रकार डी. के. वैद्य यांच्या आठवणी अकोलेकरांनी जतन करण्यासाठी पत्रकार संघाचे सुसज्ज अभ्यासपूर्ण ग्रंथालय निर्माण करावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
अकोले येथील सहकार सभागृहात नुकत्याच झालेल्या पत्रकार प्रा. डी. के. वैद्य व ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक यांच्या पत्नी रत्नप्रभा यांच्या अभिवादन सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ शेतकरी नेते झुंबरराव आरोटे हे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी पाठविलेल्या शोकसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. वैद्य यांच्या समाजशिक्षक व पत्रकार म्हणून केलेल्या कार्याचे पुस्तक तयार केल्यास येणार्या पत्रकार पिढीला एक अभ्यासाचा दस्तावेज ठरेल असे मत कांबळे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक अनिल सहस्त्रबुद्धे, आमदार डॉ. सुधीर तांबे, शांताराम गजे, प्रकाश टाकळकर, श्रीनिवास येलमामे, हेरंब कुलकर्णी, विनय सावंत, वकील बाळासाहेब वैद्य, देवीदास भालेराव, बी. जे. देशमुख, वसंत मनकर यांनी भावना शब्दांकित केल्या.
पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश आरोटे यांनी सूत्रसंचालन तर हेमंत आवारी यांनी आभार मानले. नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, प्रा. तुळशीराम जाधव, अरूण कान्होरे, भाऊसाहेब मंडलिक, जे. डी. आंबरे, मीनानाथ पांडे, दीपक महाराज देशमुख, अशोक आरोटे, वकील अनिल आरोटे, अंतनू घोडके, मच्छिंद्र धुमाळ, संतोष साबळे, अयाज शेख, विद्याचंद्र सातपुते आदी उपस्थित होते.