संगमनेर शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचे वाजले बारा! वाहतूक शाखा निष्क्रीय; भररस्त्यातील अतिक्रमणंही ठरताहेत कारणीभूत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वैभवशाली शहराची बिरुदावली मिरवणार्या संगमनेर शहरातील अंतर्गत वाहतुकीची समस्या काही केल्या संपण्याचे नाव घेत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. काही बेशिस्त वाहनधारकांसह जागोजागी मोठ्या प्रमाणात बोकाळलेल्या अतिक्रमणांमुळे पुणे-नाशिक महामार्गासह शहराच्या सर्वच अंतर्गत रस्त्यांवर वारंवार वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने संगमनेरकरांना नाहक मनःस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे कधीकाळी बासनात गुंडाळल्या गेलेल्या संगमनेर वाहतूक उपविभागाचे तब्बल पंधरा पोलीस कर्मचारी शहर पोलीस ठाण्याशी संलग्न असूनही शहराच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागत नसल्याने सध्या या शाखेचा पदभार असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न निर्माण झाले आहेत.
जिल्ह्यातील आघाडीच्या तालुक्यांमध्ये गणल्या जाणार्या संगमनेरचा गेल्या काही दशकांत झपाट्याने विकास झाला आहे. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी या प्रमुख नद्यांच्या पाण्यातून तालुक्यात समृद्धी नांदल्याने संगमनेरच्या बाजारपेठेने आसपासच्या तालुक्यांमधील शंभर-दीडशे किलोमीटरपर्यंत आपल्या व्यापाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. विविध व्यवसायांसह अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून शहरात दररोज हजारो वाहनांची वर्दळ होत असल्याने शहरातंर्गत वाहतुकीचे रस्ते दिवसरात्र वाहनांनी गजबजलेले दिसत आहेत. मात्र गावठाणासह नव्याने विस्तारलेल्या शहरीभागातील संकुचित रस्त्यांमुळे आता ही समृद्ध बाजारपेठही सामान्यांना डोकेदुखी ठरत आहे.
कधीकाळी शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून शास्त्री चौक ते तेलीखुंटचा परिसर मानला जायचा. मात्र जसजशी शहरातील व्यापार उदिमाची प्रगती झाली आणि दुसरीकडे दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही वाढली, तसतशी ही बाजारपेठ ग्राहकांसाठी गैरसोयीची ठरु लागली. त्याचा परिणाम गेल्या दीड-दोन दशकांत शहराच्या जुन्या बाजारपेठेतील अनेक नामांकित व मोठ्या आस्थापनांनी आपली दुकाने संगमनेरच्या हमरस्त्यावर थाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहराच्या जून्या बाजारपेठेचे महत्त्व कमी झाले आणि आज केवळ ती इतिहासाच्या पानांमध्येच आपले प्राचिनत्त्व सांगू लागली.
जुन्या बाजारपेठेतून शहराच्या मुख्य रस्त्याकडे सरकलेल्या नवीन बाजारपेठेलाही आता बेशिस्ती आणि अतिक्रमणांमुळे घरघर लागल्यासारखी स्थिती दिसू लागली आहे. संगमनेरचा मेनरोड कोल्हार-घोटी राज्यमार्गाचा भाग असूनही हा रस्ता अतिशय अरुंद आहे. त्यातच बाजारपेठेतून मेनरोडवर आपले दुकान उभारताना अपवाद वगळता सर्वच आस्थापनांनी आपल्या दुकानात येणार्या ग्राहकांच्या वाहनांचा विचारच केला नाही. त्याचा परिणाम या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ, त्यातच प्रत्येक दुकानासमोर बेशिस्तीने उभ्या असलेल्या असंख्य दुचाकी आणि त्यात भर म्हणून जागोजागी भररस्त्यातच ठाण मांडून बसलेले फेरीविक्रेते यामुळे आता या रस्त्याचीही रया जावू लागली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते चावडी चौकापर्यंतचा रस्ता म्हणजे नव्या आणि जुन्या शहरांना एकमेकांशी जोडणारा प्रमुख दुवाच आहे. त्यामुळे हा रस्ता भल्या सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत माणसं आणि वाहनांनी गजबजलेला असतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फेरीविक्रेत्यांचाही भरणा असल्याने आधीच चिवळ असलेल्या या रस्त्यावर वारंवार होणारी वाहतुक कोंडी सामान्य संगमनेरकरांसाठी अतिशय त्रासदायक ठरते. त्यातच या रस्त्यावर अशोक चौक व चावडी चौक येथे काही रिक्षाचालक बेकायदा थांबा निर्माण करुन आपल्या रिक्षा उभ्या करीत असल्याने त्या माध्यमातून शहराच्या बेशिस्तीतही मोठी भर पडत आहे.
बसस्थानकाचा परिसर, अकोले बायपास रस्ता आणि अतिशय वर्दळीचा नवीन नगर रोडची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. नवीन नगर रस्त्यावर तर पालिकेकडून वारंवार कारवाया होवूनही येथील अतिक्रमणधारक जागा सोडायला तयार नसल्याने त्याचा त्रास सामान्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. हॉटेल काश्मिर समोरुन जाणार्या अकोले बायपास रस्त्यावर घुलेवाडी शटलसेवा देणार्या असंख्य रिक्षांचा थांबा आहे. त्यामुळे येथे प्रवाशी आणि रिक्षा यांची भररस्त्यातच भराई आणि उतराई सुरु असते. त्याचा मोठा त्रास असतानाही त्यांना केवळ राजकीय आशीर्वाद प्राप्त असल्याने त्यांची मनमानी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यांच्याकडून वाहतूक नियम सर्रास पायदळी तुडविले जातात. या सर्व घटनांचा मनःस्ताप मात्र सामान्य नागरिकाला सहन करावा लागत असल्याने आणि त्यांचा आवाज ऐकायला कोणतीही यंत्रणा नसल्याने वैभवशाली म्हणून बिरुदावली मिरवणार्या संगमनेरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्था वारंवारच्या कारवायांनंतरही कायम आहे.
काही वर्षांपूर्वी बासनात गुंडाळली गेलेली संगमनेर उपविभागाची वाहतूक शाखा चार वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पुन्हा सुरू केली. या शाखेसाठी एका सहाय्यक निरीक्षकांसह पंधरा कर्मचारी देण्यात आले. मात्र त्यांच्यानंतर या शाखेला पुन्हा मरगळ आली. या शाखेच्या प्रभारी अधिकार्याच्या बदलीनंतर त्याचे नियंत्रण शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे देण्यात आले. त्यामुळे या माध्यमातून शहर पोलिसांना अतिरिक्त पंधरा कर्मचारी प्राप्त होवूनही नियोजनाच्या अभावामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीला शिस्त लागू शकली नाही. त्यामुळे संगमनेरला स्वतंत्र वाहतूक शाखा असूनही संगमनेरच्या वाहतुकीची अवस्था मात्र बिकटचं आहे.