शिर्डीमध्ये रंगपंचमी निमित्तची ‘रथयात्रा’ निघणार! कोविड नियम पाळण्याच्या अटीवर जिल्हाधिकार्यांची परवानगी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जिल्हाधिकार्यांनी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे कारण सांगत शिर्डीत रंगपचंमीनिमित्त काढण्यात येणारी रथयात्रा रद्द करण्यात आली होती. यामुळे झालेली भक्तांची नाराजी लक्षात घेऊन जिल्हाधिकार्यांनी कोविड नियमांचे पालन करण्याच्या अटीवर रथयात्रेला परवानगी दिली आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता रंगपंचमी निमित्तची रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

करोनाचे प्रमाण कमी झाल्याने शिर्डीतील साई दर्शनासाठीचे नियम आणखी शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र, विविध सण-उत्सव आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी 22 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. त्यामुळे शिर्डीतील गुरुवारची पालखी व रंगपंचमी निमित्ताने निघणारी रथयात्रा मिरवणूक स्थगित करण्यात आली होती. यावरून भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याशी यासंबंधी चर्चा केली. रथयात्रेला परवानगी देण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे.

आता मंगळवारी सायंकाळी 5 वाजता शिर्डीतून रथयात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी प्रशासन सहकार्य करणार आहे. तर रथयात्रेसाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. भाविकांनी कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेत, तसेच करोना नियमांचे पालन करुन या रथयात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.
