26 मार्चपर्यंत छत्रपतींच्या स्मारकाभोवतीचे अतिक्रमण हटवा! पालिकेची जागा मालकास ‘अंतिम’ नोटीस; अन्यथा पालिका कारवाई करणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगमनेरातील स्मारकाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुमारे चार दशकांपूर्वी उभारलेल्या येथील एकमेव स्मारकाचा विस्तार करुन त्याचे सुशोभीकरण व्हावे अशी असंख्य शिवप्रेमींची मागणी आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपरिषदेने गेल्या वर्षी जूनमध्ये संबंधित जागामालकास नोटीस बजावून त्याचे बांधकाम बंद केले होते. तर, युवानेते सत्यजीत तांबे यांनी मध्यस्थी करीत किमान पंधरा फुट जागा सोडण्यासाठी शिष्टाई केली होती. मात्र त्यातून कोणताही सकारात्मक निर्णय न झाल्याने स्मारकाच्या विस्तारीकरणाचा विषय खितपत पडला आहे, मात्र आता या विषयाने पुन्हा एकदा उचल घेतली असून शिवप्रेमींच्या मागणीवरुन पालिकेने संबंधित जागामालकास अंतिम नोटीस बजावली आहे. त्यामुळे ऐन शिवजयंतीच्या वातावरणात शिवस्मारकाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सन 1980 साली संगमनेर नगरपरिषदेने अरगडे गल्लीतील मारुती मंदिरासमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा उभारली होती. तेव्हापासून संगमनेरात छत्रपतींचे एकमेव स्मारक म्हणून त्याकडे पाहीले जाते. यानंतरच्या कालावधीत संगमनेर बसस्थानकाची नव्याने निर्मिती झाल्यानंतर त्या समोरील प्रशस्त चौकात शिवरायांची अश्वारुढ प्रतिमा उभारण्याचाही विषय समोर आला होता, मात्र त्याबाबत राजकीय पातळीवरुन अनास्थाच दिसून आल्याने ही मागणीही फारकाळ टिकली नाही.
याच दरम्यान गेल्या वर्षी अरगडे गल्लीतील शिवस्मारकाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नॉव्हेल्टी लॉजची इमारत जागा मालकाने पाडली व तेथे नव्याने बांधकाम करण्याचा घाट घातला. मात्र त्यांच्या या कृतीवरुन संगमनेरातील शिवप्रेमींचा संताप झाला आणि शहरातील एकमेव असलेल्या या स्मारकाच्या नूतनीकरणासह विस्ताराचा विषय समोर येवून त्यासाठी आंदोलन उभे राहू लागले. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणजे पालिकेने संगमनेरातील शिवप्रेमींच्या लेखी मागणीवरुन गेल्या वर्षी जूनमध्ये संबंधीत जागामालकास नोटीस बजावून 24 तासांत स्मारकाभोवतीची अतिक्रमीत जागा मुक्त करण्यास बजावले. मात्र या गोष्टीला सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही ना जागामालकाने अतिक्रमण हटवले, ना पालिकेने ते हटवण्यास त्याला भाग पाडले. मात्र तेव्हापासून सदर ठिकाणी जागामालकाने सुरु केलेले बांधकाम बंद आहे.
या कालावधीत युवानेते सत्यजित तांबे यांनीही मध्यस्थी करुन शिवस्मारकासाठी किमान पंधरा फुट जागा सोडण्याची विनंती संबंधित जागा मालकास केली, मात्र त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संगमनेरकरांसाठी शिवस्मारकाचा विषय वादग्रस्त ठरलेला असताना आता त्याला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. 24 तासांच्या नोटीसनंतरही अतिक्रमण कायम असल्याने शहरातील शिवप्रेमींनी पुन्हा एकदा पालिकेशी पत्रव्यवहार करुन ‘त्या’ नोटीसची आठवण करुन देण्यात आली. त्यानंतर आता पालिकेने संबंधितास 30 दिवसांचा कालावधी देत अंतिम नोटीस बजावली असून येत्या 26 मार्चपर्यंत शिवस्मारकाभोवतीचे अतिक्रमण काढून घ्या अन्यथा पालिका त्यावर कारवाई करील असा इशारा या नोटीशीतून देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापूर्वी सुरु झालेला हा वाद आता पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सुमारे 2200 वर्षांहून अधिक मोठा इतिहास असलेली संगमनेरनगरी अनेक ऐतिहासिक घटनांचीही साक्षी आहे. महाराजा शहाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व इंदिरा गांधी अशा एक ना अनेक विभूतींच्या पदस्पर्शाने संगमनेरची भूमी पावन झालेली आहे. अशा या ऐतिहासिक नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे देखणे आणि भव्य स्मारक असावे अशी तमाम संगमनेरकरांची मागणी आहे. त्यासाठी सध्याच्या स्मारकाचे विस्तारीकरणासह सुशोभिकरण व्हावे यासाठी शिवप्रेमींनी आंदोलनही उभारले आहे.