बाळासाहेब थोरातांच्या खोलीवरुन ‘दोन’ आमदारांमध्ये द्वंद्व! खोली क्र.‘212’चे रहस्य उलगडेना; विधानसभा सचिवालयाचेही आगीत तेल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होवून तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. बहुतेक आमदार आपापल्या मतदारसंघात कार्यरतही झाले आहेत. अशात निकालांपासूनच विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे आणि आमदार अमोल खताळ या दोघांमध्ये तालुक्यातील विविध विकासकांमावरुन रस्सीखेच सुरु असल्याचे दररोज समोर येत आहे. यासर्व राजकीय घडामोडी अपेक्षित असतानाच आता मुंबईच्या ‘आकाशवाणी’ या आमदार निवासातूनही खळबळजनक वृत्त समोर आले आहे. या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील ‘212’ क्रमांकाच्या खोलीवरुन सध्या दोन आमदारांमध्ये प्रकरण तापले आहे. सदरची सदनिका गेल्या दीड दशकांपासून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे होती. मात्र त्यांचा पराभव झाल्यानंतर दोनच दिवसांत आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांच्याकडे सहाव्या मजल्यावरील कक्ष असतानाही विधानसभा सचिवालयाकडे या खोलीची मागणी केली. चालू वर्षाच्या सुरुवातीला सचिवालयाने त्यांची मागणीही पूर्ण केली. मात्र आमदार निवासाच्या वाटपात पराभूत उमेदवाराचा कक्ष निवडून येणार्‍या उमेदवारालाच देण्याचा प्रघात असल्याने आमदार अमोल खताळ यांच्या मागणीवरुन त्यांनाही 30 जानेवारी रोजी सचिवालयाने ‘तोच’ कक्ष देण्याचे आदेश दिले. त्याच्या ताब्यावरुन आता खताळ विरुद्ध तांबे असे राजकीय द्वंद रंगले असून ‘212’ क्रमांकाच्या खोलीचे नेमके रहस्य काय असा प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल लागले. त्यात संगमनेरचाही समावेश होता. या निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांना पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला. अतिशय सूप्त लाटेतून घडलेल्या या अनपेक्षित परिवर्तनातून थोरात समर्थक अद्यापही सावरलेले नसताना विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजीत तांबे संगमनेर मतदारसंघात अचानक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. वास्तविक आमदार तांबे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची अत्यंत जवळीक असल्याचे अवघ्या राज्याला माहिती आहे. अशावेळी संगमनेरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने दोन्ही आमदारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली असून गेली अनेक वर्ष रेंगाळत पडलेल्या कामांनाही मुहूर्त लागण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.


यासर्व घडामोडी संगमनेर मतदारसंघातील बदललेल्या वातावरणाचा राजकीय परिणाम म्हणून बघितल्या जात असताना आता हा वाद थेट आमदारांसाठी असलेल्या ‘आकाशवाणी’ या मुंबईतील इमारतीत पोहोचला आहे. एका विशिष्ट क्रमांकाची सदनिका मिळावी म्हणून या दोघांमध्ये पराकोटीचा संघर्ष सुरु आहे. विशेष म्हणजे 23 नोव्हेंबररोजी निवडणूक निकाल घोषित झाल्याच्या तिसर्‍याच दिवशी आमदार सत्यजित तांबे यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कक्ष मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केला आणि त्यांना तो कक्ष प्रदानही करण्यात आला. अर्थात त्यावेळी त्यांच्याकडे याच इमारतीत सहाव्या मजल्यावरील ‘624-अ’ या क्रमांकाचा कक्ष पूर्वीपासूनच ताब्यात होता. त्यानंतर सचिवालयाने 17 जानेवारी 2024 रोजी पुन्हा त्यांना सहाव्या मजल्यावरील कक्ष सोडण्याच्या अटीवर ‘212’ क्रमांकाचा कक्ष देण्याचे आदेश काढले.


या दरम्यान माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करुन विधानसभेत पोहोचलेल्या आमदार अमोल खताळ यांनी ‘212’ क्रमांकाची सदनिका मिळण्यासाठी सचिवालयाला पत्र दिले. त्यावर 30 जानेवारीरोजी निर्णय होवून ‘आकाशवाणी’ इमारतीतली 212 क्रमांकाची सदनिका त्यांना देण्यात यावी असे आदेश विधानमंडळाच्या सचिवालयाने बजावले. मात्र तत्पूर्वीच आमदार सत्यजीत तांबे यांच्या ताब्यात असलेल्या या कक्षावरुन वाद निर्माण झाल्याने आमदार तांबेंनी आपले राजकीय ‘वजन’ वापरुन 7 फेब्रुवारी रोजी पुन्हा नव्याने ‘212’ क्रमांकाची सदनिका मिळवल्याचा आदेश आणला. त्यावरुन दोन्ही आमदारांमध्ये वाद निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षकांनी सचिवालयाकडून अभिप्रायही मागवला होता.

त्याचा संदर्भ देत सचिवालयाने 18 फेब्रुवारीरोजी पीठासीन अधिकार्‍यांनी दिलेल्या मान्यतेनुसार 7 फेब्रुवारीच्या आदेशानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरुन 212 क्रमांकाची सदनिका आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट असून त्यावरुन आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटणार आहे. यासर्व घटनाक्रमात विधीमंडळाच्या सचिवालयाने ‘212’ क्रमांकाच्या सदनिकेसाठी वारंवार आदेश काढून एकप्रकारे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. त्यावरुन या प्रकरणाला वरीष्ठ पातळीवरुन पाठबळ मिळत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने ‘212’ क्रमांकाची खोली ‘महायुती’च्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.


पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्याकडे असलेली सदनिका आपोआप आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडे आली. त्यानुसार माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने त्यांच्या जागी निवडून आलेल्या आमदाराला त्यांची सदनिका मिळाली पाहिजे. अशी परंपराही आमदार निवासाच्या बाबतीत जोपासली जाते. मात्र असे असतानांही आमदार तांबे यांचा ‘212’ क्रमांकाच्या सदनिकेसाठीचा अट्टाहास अनाकलनीय आहे. हा प्रकार जाणीवपूर्व माझ्या कार्यकर्त्यांना व मुंबईत काम घेवून येणार्‍या सर्वसामान्य लोकांना त्रास व्हावा या हेतूने केला जात आहे. छोटीसा विषय प्रतिष्ठेचा करण्याचा हा केविलवाणा प्रकार असून पुढील आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार आहे. एक सदनिका ताब्यात असतानाही दुसरी ताब्यात घेण्याचा त्यांचा नेमका हेतू काय आहे?. एका सामान्य कार्यकर्त्यांने त्यांची चार दशकांची सत्ता उलथवून विजय मिळवल्याचे शल्य अद्यापही विरोधकांचा खूपत आहे. त्यातूनच आपल्याला ‘त्रास’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आपण कोठेही कमी पडणार नाही.
– अमोल खताळ
आमदार, संगमनेर विधानसभा


नाशिक पदवीधर मतदारसंघ खूप मोठा असून काम घेवून येणार्‍यांचा ओघही तितकाच आहे. अशावेळी मला एका अतिरीक्त सदनिकेची गरज होती. मात्र वारंवार प्रयत्न करुनही रिक्त होणारी सदनिका मिळाली नाही. दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्याने रिक्त होणारी त्यांची सदनिका आपणांस मिळावी म्हणून सचिवालयाला विनंती केली. त्यानुसार 17 जानेवारीरोजी आपणास सदरचा कक्ष देण्यात आला व 21 जानेवारीरोजी त्याचा ताबा मिळाला. 7 फेबु्रवारीरोजी विधानमंडळाच्या सचिवालयाने दुबार आदेश काढून सदरची सदनिका आपणांस देण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात काहींनी या खोलीची मागणी केली. प्रशासनाने प्रधान सचिवांकडून अभिप्रायही मागवला. त्यानंतर 18 फेबु्रवारी रोजी पुन्हा नव्याने आदेश काढून 7 फेब्रुवारीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. हा विषय खूप छोटासा आहे, त्याला मोठं करु नये. ‘ताबा’ वगैरे घेण्याचा आमचा स्वभाव नाही हे राज्याला माहिती आहे.
– सत्यजीत तांबे
आमदार, नाशिक पदवीधर

Visits: 55 Today: 1 Total: 306765

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *