डॉ. पोखरणा यांची शिरूरच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय राज्यपालांनी फिरविला

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष सुरूच आहे. राज्य सरकारचे राजकीय सोयीचे अनेक निर्णय राज्यपालांनी फिरविले किंवा राखून ठेवले आहेत. त्या पाठोपाठ आता प्रशासकीय निर्णयातही राज्यपालांनी विशेष अधिकार वापरून राज्य सरकारचा निर्णय फिरविण्याची सुरुवात केल्याचे दिसून येते. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील आगीसंबंधी निष्काळजीपणाचा ठपका ठेवून तत्कालीन जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना सरकारने निलंबित केले होते. राज्यपालांनी आपला विशेष अधिकार वापरून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द केले आहे. त्यानंतर त्यांना नगरच्या शेजारीच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर, 2021 रोजी आग लागली होती. यामध्ये 14 रुग्णांचा भाजून आणि होरपळून मृत्यू झाला. हे प्रकरण राज्यभर गाजले. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यानंतर सरकारने डॉ. पोखरणा यांच्यासह सहा जणांना निलंबि केले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केला. यामध्ये सुरुवातीला डॉ. पोखरणा सोडून इतर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना अटक झाली. त्यावरून पुन्हा आंदोलने पेटली. ज्यांचा संबंधी नाही, त्यांना अटक करण्यात आली असून सूत्रधार मोकळेच असल्याची टीका विविध संघटनांकडून करण्यात आली. मधल्या काळात डॉ. पोखरणा यांनी अटकपूर्व जामीन घेतला. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकली नाही. यासाठी सरकारने चौकशी समिती नियुक्ती केली. प्रदीर्घ काळाने त्याचा अहवाल आला. त्यामध्ये डॉ. पोखरणा यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी अलीकडेच पोखरणा यांच्या अटकेचे सोपस्कार पार पाडून त्यांना तातडीने जामिनावर मुक्त केले. समितीचा संपूर्ण अहवाल मात्र अद्याप उघड करण्यात आलेला नाही.

आता राज्यपालांकडून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. राज्यपालांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1978 मधील नियम 4 च्या पोटनियम (5) खंड (क) यानुसार यासंबंधीचे अधिकार आहेत. त्यांचा वापर करून डॉ. पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानंतर राज्य सरकारचे कार्यासन अधिकारी वैभव कोष्टी यांच्या स्वाक्षरीने डॉ. पोखरणा यांच्या नव्या ठिकाणावरील नियुक्तीचा आदेश जारी करण्यात आला. पोलिसांकडे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास अद्याप प्रलंबित आहे. चौकशी अहवाल जाहीर झाला नसल्याने आगीचे नेमके कारणही अद्याप नागरिकांना कळालेले नाही.

Visits: 101 Today: 2 Total: 1107849

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *