शेतकरी हिताचा ‘अकोले पॅटर्न’ देशाला आदर्श ठरणार ः प्रा. वंजारे 6 ते 8 महिन्यांत सर्व तालुक्यांत शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू होणार
नायक वृत्तसेवा, अकोले
समृद्ध शेतकरी मिशन अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून, शेतीपूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न देणारा व शेती व्यवसायाला नवसंजीवनी देणारा शेतकरी हिताचा ‘अकोले पॅटर्न’ तयार झाला आहे. हा देशाला दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन शेतीतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ व ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रा. काशिराम वंजारे यांनी केले.
वीरगाव (ता. अकोले) येथील मातोश्री राधा फार्मसी कॉलेजवर आयोजित शेतकरी परिसंवाद व नियोजन बैठकीवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आंतरभारतीचे अध्यक्ष तथा अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे होते. व्यासपीठावर ओबीसी चेंबरचे सल्लागार धनंजय वार्डेकर, नाशिक समन्वयक भूषण पाटील, अर्षद काजी, अहमदनगर समन्वयक विजय बोरसे, ज्ञानेश्वर गायकर, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, अगस्तिचे संचालक सुनील दातीर, बाळासाहेब मुळे, भाऊसाहेब वाकचौरे, अनिल रहाणे, नानासाहेब थोरात, राहुल बेनके आदी उपस्थित होते. कृषी संजीवनी डाळिंब व भाजीपाला उत्पादक गट, विठे परिसर शेतकरी उत्पादक गट, अगस्ति परिसर शेती गट, कृषी विभाग आत्मा, डोंगरगाव परिसर कृषी उत्पादक गट, ब्राम्हणवाडा परिसर शेतकरी उत्पादक गट, समशेरपूर परिसर कृषी उत्पादक गट, आढळा विभाग कृषी गट आदी शेतकरी गटांच्या पदाधिकार्यांनी परिसंवादात सहभाग नोंदविला.
अकोले तालुक्यातील शेतकरी कंपनी हे भारतातील मॉडेल ठरणार आहे. प्रत्येक सभासद शेतकर्यास सुरवातीस दरमहा किमान 500 रुपये तर कमाल वार्षिक 25 हजार रुपये खात्यावर जमा होतील असे काम उभे राहणार आहे. कॅनडा, नेदरलँड येथून कृषी कंपनीस आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रयत्न आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम शेती व त्यास लागणारे अर्थ सहाय्य दोन्ही देशांतून मिळविले जाणार आहे. शेती कंपनी तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनून स्वतःची सर्व अवजारे शेतकरी सभासदांना ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर भाड्याने देणार, शेतीपूरक सर्व व्यवसाय, कचरा व्यवस्थापन व शेणातून गॅस निर्मिती करणार, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रीय शेती व्यवस्थापन, निर्यातक्षम पीक व्यवस्थापन करणार आहे. हमी बाजारभाव घेवून पोल्ट्री व शेळी पालन व्यवसाय उभा करणे, शेतीपूरक व्यवसायातून उत्पादित माल खरेदी करून त्यास योग्य बाजारपेठ व रास्त भाव मिळवून देणे, उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य व अनुदान उपलब्ध करून देणे आदी गोष्टी शेतकरी कंपनी करणार असल्याचे प्रा. वंजारे यांनी पुढे सांगितले.
कृषी विकास व रोजगार निर्मिती यातील दीर्घ अनुभव असलेले संचालक व शेतकरी समृद्धी, उद्योग उभारणी यासाठी समर्पित असलेली ओबीसी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर या कंपनीची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व सल्लागार यांच्याशी संलग्नता आहे. खाद्यतेल प्रकल्पामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याशी सहमती करार आहे. डिमिट्रा इन्कॉरपोरेटेड कॅनडा या आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत तंत्रज्ञानाचा करार केला आहे. या कंपनीचा ‘अकोले पॅटर्न’ लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी शेतकर्यांमध्ये जागृती व शेतीपूरक व्यावसायिकांसाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या पॅटर्नच्या उद्घाटनसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादा भुसे आदी मान्यवर निमंत्रित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी शेतकरी जागृती, कंपनी माहिती सर्व शेतकरी व उद्योजक यांच्यापर्यंत पोहोचविणे, सभासद नोंदणी आदी गोष्टींवर चर्चा करण्यात आली. यावेळी गणेश तोरकड, श्यामराव वाकचौरे, संपत वाकचौरे, आशिष देशमुख, बाबासाहेब उगले, अशोक उगले, बाळनाथ सोनवणे, कैलास आरोटे, डॉ. वैद्य, शिवाजी वाकचौरे, पोपट हांडे, विजय वाघ, रामदास आंबरे, सुदाम तोरकड, प्रवीण धुमाळ, अशोक धुमाळ, विजय शेळके, अंकुश काकड आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. या कार्यक्रमास संतोष वर्पे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दराडे, नीलेश सहाणे, भानुदास बोडके, डॉ. खुळे, अनिल डोळस, दिनेश वाकचौरे आदिंसह संगमनेर-अकोले तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर गायकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. संदीप थोरात यांनी केले तर आभार अनिल रहाणे यांनी मानले.