अवकाळी पावसाचा पोहेगाव परिसरातील रब्बी पिकांना फटका हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी आदी परिसरात बुधवारी (ता.8) सकाळी नऊ वाजता अवकाळी पाऊस पडला. या पावसाने शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानुसार या परिसरात बुधवारी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेतामध्ये सध्या रब्बीचे गहू, हरभरा, भाजीपाला व कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतलेले आहे. या अवकाळी पावसामुळे कांदा व गहू पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. गहू काढणीला आला आहे तर कांदा पीकही शेवटच्या पाण्यावर असतानाच अवकाळी पावसाने कहर केला आहे.
या सुरू असलेल्या पावसामुळे गव्हाच्या पिकाला कवडी पडण्याचे संकट निर्माण झाले आहे तर कांदा पिकाच्या पाथीमध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे कांदा साठवणीसाठी योग्य राहणार नसल्याने शेतकर्यांना मातीमोल भावामध्ये हा कांदा विकावा लागणार आहे. सोनेवाडी, पोहेगाव, चांदेकसारे, डाऊच खुर्द, घारी, देर्डे-कोर्हाळे, देर्डे चांदवड परिसरात मोठ्या प्रमाणात शेतामध्ये कांदा व गव्हाचे पीक आहे. मात्र, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.