संगमनेर तालुक्याच्या कोविड लढ्याला मोठा धक्का! कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश; ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण वार्यावर..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली कंत्राटी पद्धतीची कर्मचारी नियुक्ती संपुष्टात आणण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य संचनालयाने दिले आहेत. त्यानुसार संगमनेरच्या इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदारांनी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात सेवेत असलेल्या 31 कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश बजावले आहेत. शासनाच्या या निर्णयाने तिसर्या लाटेची तयारी करणार्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला असून सध्या उपचार सुरु असलेल्या जवळपास नव्वद कोविड रुग्णांची उपचार प्रक्रिया अधांतरीत झाली आहे. शासनाच्या या निर्णयामूळे घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्ण दाखल करुन घेण्यावरही मर्यादा आल्या असून आता यापुढे बहुतेक गंभीर रुग्णांना थेट जिल्हा शासकीय रुग्णालयातच भरती व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फेब्रुवारी-मार्चपासून राज्यात कोविड संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरुन राज्य सरकारने ठिकठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये खाटांची क्षमता वाढवून त्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांसह क्ष-किरण तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कक्ष सेवक, सहाय्यक परिचारिका, भांडारपाल आणि स्वच्छता कर्मचारी अशा पदांची ठेकेदारी करारानुसार भरती करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी केंद्र सरकारच्या कोविड 2 निधीचा वापर करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार संगमनेरच्या प्रशासनाने 8 एप्रिल रोजी थेट मुलाखतींद्वारा घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी एका आरोग्य अधिकार्यासह 32 जणांची कंत्राटी पद्धतीने सरळ भरती करुन दुसर्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता चाळीस रुग्णांवरुन थेट 120 रुग्णांपर्यंत विस्तारली होती. एप्रिल व मे या दोन महिन्यात तालुक्यात आढळलेल्या मोठ्या संख्येतील सामान्य रुग्णांना त्याचा मोठा फायदाही झाला आणि शेकडो रुग्णांचे जीवही वाचले.
मात्र राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने जून, जुलैपासूनच मानधनासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचे सांगत या सर्व कर्मचार्यांची सेवा संपुष्टात आणण्याचे निर्देश दिले होते. गेल्या 27 ऑगस्ट रोजी प्राप्त झालेल्या अशाच एका आदेशाद्वारे संचालनालयाने 31 ऑगस्ट पूर्वी राज्यातील अशा सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय आवश्यकता असेलच तर स्थानिक प्रशासनाने अन्य पर्यायांचा अवलंब करण्याची सूचनाही देण्यात आली होती. मात्र अन्य पर्याय म्हणजे नेमका कोणता? याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने स्थानिक प्रशासन हतबल झाले. यासर्व कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांच्या मासिक मानधनासाठी दरमहा सुमारे पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे, मात्र तो मिळविण्याचे पर्यायच नसल्याने अखेर संगमनेरचे तहसीलदार तथा इंन्सीडेंट कमांडर अमोल निकम यांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजकुमार जर्हाड यांना अशा सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांची सेवा 31 ऑगस्ट पूर्वी संपुष्टात आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील 31 कर्मचार्यांची सेवा खंडीत करण्यात आली आहे.
शासनाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील कोविडची दुसरी लाट ओसरत असूनही संगमनेरात दररोज आढळणार्या मोठ्या प्रमाणातील सामान्य रुग्णांना बसणार असून सध्या 120 कोविड बाधितांवर उपचार करण्याची क्षमता असलेल्या घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता कमी होवून ती अवघ्या 40 ते 50 रुग्णांवर येणार आहे. एकीकडे दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध मंत्री व नेते दररोज संभाव्य तिसर्या लाटेचा इशारा देत असताना, दुसरीकडे त्यासाठी सज्ज असलेल्या शासकीय रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्यांना सेवामुक्त केले गेले आहे. त्यामुळे संगमनेरच्या कोविड विरोधातील लढ्याला मोठा धक्का बसला असून सध्या ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या सुमारे नव्वदहून अधिक कोविड बाधितांचे उपचार अधांतरीत झाले आहेत.
कोविडच्या कालावधीत संगमनेरच्या आरोग्य सज्जतेचे मूल्यमापन करतांना त्यात अकोले तालुक्यातील आरोग्य संसाधनांचाही समावेश गृहीत धरण्यात येवून त्यानुसार नियोजन केले जाते. संगमनेर व अकोले तालुक्याची एकत्रित लोकसंख्या सुमारे दहा लाखांच्या घरात आहे. या दोन्ही तालुक्यातील कोविड संक्रमण अद्यापही थांबलेले नसतांना राज्य सरकारने कंत्राटी आरोग्य कर्मचार्यांची सेवाच संपुष्टात आणल्याने तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य संसाधनांशिवाय शासनाने या दोन्ही तालुक्यातील सामान्य नागरिकांना वार्यावर सोडल्याचे दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा संगमनेरचे लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष्य घालण्याची गरज आहे. अन्यथा संभाव्य तिसर्या लाटेत सामान्यांच्या जीवाची किंमत शून्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.